विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाचे वाजले सूप
अनिश्चित कालावधीसाठी कामकाज तहकूब : 10 दिवस चालले कामकाज : प्रामुख्याने उत्तर कर्नाटकाच्या विकासावर अधिक वेळ चर्चा
बेळगाव : सोमवार दि. 8 डिसेंबरपासून बेळगाव येथील सुवर्ण विधानसौधमध्ये सुरू झालेल्या कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे शुक्रवारी सूप वाजले. उत्तर कर्नाटकाच्या विकासाच्या मुद्द्यावर प्रदीर्घ चर्चा झाली खरी, मात्र सरकारने ठोस उत्तर दिले नाही. दहा दिवसांत 57 तास 35 मिनिटांपर्यंत विधानसभेचे कामकाज चालले. शुक्रवारी सायंकाळी सभाध्यक्ष यु. टी. खादर फरीद यांनी आतापर्यंतच्या कामकाजाचा आढावा मांडला. अलीकडे निधन झालेले आजी-माजी राजकीय नेते व इतर महनीय व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली. या अधिवेशनात पुरवणी अंदाजपत्रकालाही मंजुरी मिळवण्यात आली. भारतीय लेखा परीक्षकांनी दिलेले चार अहवालही विधानसभेत सादर करण्यात आल्याचे सभाध्यक्षांनी सांगितले.
धन विनियोग विधेयकासह एकूण 23 विधेयके संमत करण्यात आली. खास करून सामाजिक बहिष्कार प्रतिबंधक विधेयक 2025, द्वेष भाषण प्रतिबंधक विधेयक-2025 चाही यामध्ये समावेश आहे. उत्तर कर्नाटकाच्या विकासाच्या मुद्द्यावर झालेल्या प्रदीर्घ चर्चेत 39 आमदारांनी भाग घेतला. एकूण 17 तास 2 मिनिटांपर्यंत ही चर्चा चालली. 2,109 प्रश्न स्वीकारण्यात आले होते. यापैकी सभागृहात 135 पैकी 134 प्रश्नांना उत्तरे देण्यात आली. 1,974 पैकी 1,750 प्रश्नांना लेखी उत्तरे देण्यात आले आहे. नियम 351 अन्वये 180 सूचना स्वीकारण्यात आल्या होत्या. यापैकी 70 सूचनांना उत्तर देण्यात आली. 368 लक्षवेधी सूचना मांडण्यात आल्या. यापैकी 228 लक्षवेधी सूचनांना उत्तरे देण्यात आल्याचेही सभाध्यक्षांनी सांगितले.
गुरुवार 18 डिसेंबर रोजी रायचूर जिल्ह्यात त्वरित भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्था एम्स स्थापन करावे, बेंगळूर-म्हैसूर भागातील 73 प्रमुख केंद्र सरकारच्या संस्थांपैकी 25 संस्था उत्तर कर्नाटक व कल्याण कर्नाटकात स्थापन कराव्यात, अप्पर कृष्णा योजना-3 ला राष्ट्रीय योजना म्हणून केंद्र सरकारने घोषित करावे, कल्याण कर्नाटक प्रादेशिक विकास मंडळाला विदर्भच्या धर्तीवर केंद्र सरकारने अनुदान द्यावे, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मदतीसाठी इथेनॉल खरेदीचे प्रमाण वाढवावे, म्हादईप्रश्नी आवश्यक वन व वन्यजीव मंडळाने परवानगी द्यावी, आरक्षणवाढ संविधानाच्या नवव्या शेड्यूलमध्ये समाविष्ट करावे आदी ठराव मांडण्यात आले होते. हे ठराव आवाजी मतदानाने संमतही करण्यात आले.
शुक्रवारी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सभाध्यक्ष यु. टी. खादर यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाचे अभिनंदन केले. त्यानंतर राष्ट्रगीताने दहा दिवसीय अधिवेशनाची सायंकाळी 5.45 वाजता सांगता झाली. राष्ट्रगीतानंतर कामकाज अनिश्चित कालावधीसाठी तहकूब केल्याचे सभाध्यक्षांनी जाहीर केले. यासंबंधी सचिवालयाच्या अधिकाऱ्यांनी अधिसूचनाही जारी केल्या आहेत.
10 दिवसांत....
- धन विनियोग विधेयकासह एकूण 23 विधेयके संमत
- 57 तास 35 मिनिटांपर्यंत विधानसभेचे कामकाज
- 135 पैकी 134 प्रश्नांना राज्य सरकारकडून उत्तरे
- 6,279 कोटींच्या पुरवणी अंदाजपत्रकाला मंजुरी
- लेखा परीक्षकांनी दिलेले 4 अहवाल विधानसभेत सादर
- विविध योजनांच्या पाठपुराव्यासाठी 8 ठराव संमत
उत्तर कर्नाटकावर...
- विकासावरील चर्चेत 39 आमदारांचा सहभाग
- एकूण 17 तास 2 मिनिटे चालली चर्चा
- प्रदीर्घ चर्चा, मात्र राज्य सरकारकडून ठोस उत्तर नाही