MLC Election | पंढरपूरमध्ये दोन तासांत एकाही मतदाराने केले नाही मतदान; जिल्ह्यात ११.८५ टक्के मतदान
सोलापूर -विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी (दि. १८) सकाळी आठ वाजल्यापासून सोलापूर शहर व जिल्ह्यातील सहा मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रियेला शांततेत सुरुवात झाली. सकाळी ८ ते १० या दोन तासांत एकूण ७३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून त्यामध्ये ३६ पुरुष व ३७ महिला मतदारांचा समावेश आहे. या कालावधीत एकूण ११.८५ टक्के मतदानाची नोंद झाली.
मात्र, जिल्ह्यातील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला तो पंढरपूर मतदान केंद्राचा. सकाळी १० वाजेपर्यंत या केंद्रावर एकाही मतदाराने मतदानासाठी हजेरी लावली नसल्याने प्रशासनासह राजकीय वर्तुळातही आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
उत्तर सोलापूर मतदान केंद्रावर सर्वाधिक प्रतिसाद मिळाला असून येथे २२ पुरुष व २४ महिला अशा एकूण ४६ मतदारांनी मतदान केले. मंगळवेढा मतदान केंद्रावर १२ पुरुष व ११ महिला मिळून २३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. अकलूज मतदान केंद्रावर एका पुरुष व एका महिलेने मतदान केले, तर दक्षिण सोलापूर केंद्रावर एका मतदाराने मतदान केले असल्याची नोंद आहे.
या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार तथा माजी आमदार राजेंद्र राऊत आणि महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव देशमुख यांच्यात थेट लढत होत आहे. जिल्ह्यातील ६१६ मतदार या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न झाले होते; मात्र शेवटच्या टप्प्यात निवडणूक अटळ ठरली.
सकाळपासून सर्व मतदान केंद्रांवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून मतदान प्रक्रिया शांततेत सुरू आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे आणि खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागल्याने निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
-----