आमदारांनी दौऱ्यादरम्यान कसे वागावे ठरवण्यासाठी विधिमंडळ समिती
आमदार दीपक केसरकरांसह ९ जणांचा समावेश
सावंतवाडी : प्रतिनिधी
आमदारांनी दौऱ्या दरम्यान कसे वागावे याबाबत विचारविनिमय करण्यासाठी विधिमंडळाची नऊ सदस्यीय विशेष समिती गठीत करण्यात आली आहे. आमदारांचे आचरण कसे असावे यासाठी ही विशेष समिती काही नियमावली करणार आहे . आमदारांचे अभ्यासदौरे अनेक ठिकाणी आयोजित करण्यात येतात. या ठिकाणी आमदारांनी कसे वागावे,यासाठी काही नियमावली आखून देण्यात येणार आहे. या विधिमंडळ समितीचे अध्यक्ष भाजपचे आमदार चैनसुख संचेती असणार असून या समितीमध्ये भाजप ,शिवसेना ,उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, या पक्षाच्या आमदारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या नऊ सदस्यीय समितीमध्ये सावंतवाडीचे आमदार तथा राज्याचे माजी शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांचा समावेश करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व विधानसभा अध्यक्ष ऍड . राहुल नार्वेकर यांच्या शिफारशीनुसार आमदार केसरकरांची नियुक्ती करण्यात आली आहे. दीपक केसरकर हे सुसंस्कृत आणि शांत स्वभावाचे मानले जातात . त्यामुळे त्यांची या विधिमंडळ समिती सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. राज्यातील शिवसेना फूटी नंतर शिंदे सेनेची जबाबदारी प्रवक्ते म्हणून आमदार केसरकर यांनी गुवाहाटीमध्ये उत्तम प्रकारे निभावली होती.अभ्यासू व अनुभवी असे ते आमदार आहेत. श्री केसरकर यांच्यासह कोकणातून आणि विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे आमदार सुनील प्रभू यांचाही समावेश आहे .तसेच माजी मंत्री तथा आमदार दिलीप वळसे पाटील , रामराजे निंबाळकर असे एकूण नऊ जण या समितीमध्ये आहेत. या समितीत श्री केसरकर यांचा समावेश झाल्याने सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.