महापुरावर कायस्वरूपी तोडगा निघेल: मंत्री आबिटकर
महापुरावा तोडगा काढण्यासंदर्भात सादरीकरण करण्यात आले आहेः जागतिक बँकेच्या माध्यमातून येत्या सहा महिन्यात यावर काम सुरू होईलः पालकमंत्री प्रकाश आबिटकर
कोल्हापूर
नृसिंहवाडी तीर्थक्षेत्रासह कोल्हापूर सांगली जिल्ह्याला महापुराचा फटका बसतो, यावर उपाययोजना करण्यासाठी पालकमंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे. जागतिक बँकेकडून ३२०० कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला, असून नुकतेच जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबतचे सादरीकरण करण्यात आले असून, जागतिक बँकेच्या परवानगीने येथे सहा महिन्यात यावर काम सुरू होणार आहे. यामुळे महापुरावर कायमस्वरूपी तोडगा निघेल. असा विश्वास राज्याचे आरोग्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिला.
नृसिंहवाडी येथे एका खाजगी कार्यक्रमानिमित्त व दत्त दर्शनासाठी आले, असता प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. यावेळी दत्त देव संस्थानच्या वतीने अध्यक्ष वैभव काळू पुजारी, सचिव गजानन गेंडे पुजारी, विश्वस्त संजय पुजारी, संजय शिरटीकर यांच्या हस्ते व ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच चित्रा रमेश सुतार,उपसरपंच रमेश मोरे, ज्येष्ठ सदस्य धनाजीराव जगदाळे, ग्रामपंचायत अधिकारी एस पी कांबळे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
पुढे बोलताना मंत्री आबिटकर म्हणाले, महापुरावर कायमचा तोडगा काढण्यासाठी जागतिक बँकेकडील ३२०० कोटी रुपयांच्या निधीच्या माध्यमातून एक प्रपोजल तयार करण्यात आली आहे, जेणेकरून महापुराचे पाणी जलसंपदा जलसंधारण व स्थानिक नागरिक स्थानिक महापालिका ग्रामपंचायती स्तरावर या पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने लवकरात लवकर होईल, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना सरकार करत आहे.
मंत्री आबिटकर पुढे म्हणाले, की महापुराला कर्नाटकचे अलमट्टी धरणाची उंची सुद्धा एक कारण आहे. सुप्रीम कोर्टाच्या सूचनेप्रमाणे धरणाची उंची वाढवण्यासाठी लवादाने स्थगिती दिली आहे. ही स्थगिती कायम राहिली पाहिजे. यासाठी राज्य शासन म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोत आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून माझेही त्यासाठी प्रयत्न चालू आहेत, असे त्यांनी यावेळी नमूद केले.
दरम्यान यावेळी पत्रकारांनी नृसिंहवाडी येथे २०२८ साली कन्यागत महापर्वकाल हा नाशिकच्या सिंहस्थ च्या धरतीवर साजरा होत आहे. यासाठी पालकमंत्री म्हणून आपण निधी द्यावा, अशी अपेक्षा आहे यावर बोलताना पालकमंत्री म्हणाले. सर्वांचा श्रद्धास्थान असलेल्या या क्षेत्रावर या निमित्ताने होणाऱ्या सोहळ्यासाठी स्थानिक नागरिक व भाविकांच्या सोयी सुविधांसाठी कोणत्याही प्रकारे निधी कमी पडू दिला जाणार नाही मागील वेळपेक्षा शिस्तबद्ध व चांगला सोहळा आपण सर्वजण मिळून साजरा करू यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही व या निधीसाठी मी निश्चित सरकारकडे पाठपुरावा करून तो जास्तीत जास्त निधी मिळेल यासाठी प्रयत्नशील असेन अशी ग्वाही त्यांनी दिली.\यावेळी माजी आमदार उल्हास पाटील, तहसीलदार अनिल कुमार हेळकर, पोलीस उपाधीक्षक रोहिणी सोळंके, पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड, सागर धनवडे, युवराज जगदाळे, शिवराज जाधव, शशिकांत बड्ड, पुजारी गुरु धनवडे, गिरीश पाटणकर, विकास कदम, बाळासाहेब कुलकर्णी आदी मान्यवर सह ग्रामस्थ उपस्थित होते.
शिरोळ तालुक्यातील टाकळीवाडी येथे कावीळीने एक युवक दगावला आहे. याबाबत बोलताना पालकमंत्री अबिटकर म्हणाले, नेमके याबाबत माहिती घेत आहे व संबंधित आरोग्य विभागाला सूचना दिल्या असून रोगराई होण्याचे मुख्य कारण पाणी हे असल्याने सर्व महापालिका नगरपालिका ग्रामपंचायत यांना नवीन प्रकारची एक "एसओपी" जाहीर केली आहे. सर्व दृष्टिकोनातून पाणी हे महत्त्वाचं आहे सगळ्या आजाराचं मूळ हे पाणी असते, त्यामुळे पाणी सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी ही स्थानिक स्वराज्य संस्थाची आहे. यासाठी ही ‘एसओपी‘ जाहीर करण्यात आली आहे, असे सांगून त्यांनी संबंधित तालुका आरोग्य अधिकारी यांना टाकळीवाडी संदर्भातील उपाययोजना संदर्भाच्या सूचना दिल्या.