लोकमान्य ग्रंथालयाच्यावतीने स्वा. सावरकरांवर व्याख्यान
बेळगाव : लोकमान्य ग्रंथालयाच्यावतीने स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त सावरकर अभ्यासक स्वरदा फडणीस यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. ‘अज्ञात सावरकर’ या विषयावर त्यांनी लोकमान्य ग्रंथालय, वरेरकर नाट्यासंघ, टिळकवाडी येथे व्याख्यान दिले. फडणीस यांनी सावरकरांच्या बालपणीच्या कथा सादर केल्या. सावरकरांचे लहानपणीचे खेळ, गणित विषय कच्चा असल्यामुळे घेतलेली मेहनत, लहान वयात केलेल्या कविता यांची माहिती दिली. अभिनव भारतची स्थापना, लोकमान्य टिळकांकडून प्रेरणा, विदेशी कपड्यांची होळी, बोटीतून लंडनचा प्रवास, रत्नागिरीतील स्थानबद्धता यासह इतर विषयांची माहिती दिली. सावरकरांचा राष्ट्रवाद हा दीर्घकाळ टिकणारा आहे. त्यामुळे सावरकरांची जयंती साजरी करताना त्यांच्या विचारांचे अनुकरण करावे, असे आवाहन फडणीस यांनी केले. प्रीतीसंगम ग्रुपच्या सुनील धर्माधिकारी, किरण कुलकर्णी, शुभांगी कारेकर, अनुराधा कुलकर्णी यांनी जयोस्तुते गीत सादर केले. कार्याध्यक्ष जगदीश कुंटे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. किशोर काकडे यांनी परिचय करून दिला. सावरकरप्रेमी संजय रायकर यांनी सुंदर प्रतिकृती तयार केल्या होत्या.