जो माणूस जोडेल अशा तरुणाची समाजाला गरज- इंद्रजीत देशमुख
विश्वासराव पाटील यांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमानिमित्त व्याख्याने आयोजन
कोल्हापूरः (कसबा बीड)
समाज जीवन मूल्यावर व नीती मूल्यावर जगतो यासाठी मोठ्यांचा आदर व लहानांची कदर करणारी पिढी घडवणे काळाची गरज आहे. जो माणूस जोडेल अशा तरुणाची समाजाला गरज आहे. आजच्या जीवनशैलीमध्ये भावनिक व सामाजिक विश्व संपत चालले आहे. वाईटाच्या जगात वाईट पहिला येतो, त्यामुळे चांगला हा भरडला जातो. आज चमकणाऱ्या वस्तूकडे सर्वजण आकर्षित होत आहेत. पण चमकणारी प्रत्येक गोष्ट चांगली असते असे नाही. यासाठी जगातील सर्वात मोठी संस्था म्हणजे कुटुंब. या संस्थेमध्ये ज्येष्ठांकडून लहानांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन व चुकीच्या वेळी चूक दाखवून देऊन भावी पिढी घडवण्याचे कार्य तुम्हा-आम्हा सर्वांचे आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद माजी मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजीत देशमुख यांनी केले. ते विश्वासराव पाटील यांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमामध्ये बोलत होते.
शिरोली दुमाला (करवीर) येथील गोकुळचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक विश्वासराव नारायण पाटील यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त व्याखानाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम शिरोली दुमाला एकनाथ विद्यालय पटांगणात संपन्न झाला. या कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलानाने करण्यात आली.
कार्यक्रमाला गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, शशिकांत पाटील चुयेकर, प्रमुख व्याख्याते इंद्रजीत देशमुख, कुंभी कासारी साखर कारखान्याचे संचालक किशोर पाटील, शिरोली दुमाला लोकनियुक्त सरपंच व रयत संघाचे अध्यक्ष सचिन पाटील, गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वासराव पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यानिमित्त अमृत महोत्सवी गौरव समितीच्या शालेय विद्यार्थ्यांनी पालकांचे पाद्यपूजन केले. पाद्यपूजन दत्तात्रय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केले. मुलांच्यात व पालकांच्यात भावनिक नाते वाढले पाहिजे. आई वडील हे घराचे सोनेरी खांब आहेत. त्यामुळे मुलांमध्ये होणारे संस्कार हे समाज व कुटुंब या माध्यमातून होत असतात असे पाद्यपूजन माध्यमातून सांगण्यात आले.

यावेळी गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, शशिकांत पाटील चुयेकर, लोकनियुक्त सरपंच व रयत संघाचे अध्यक्ष सचिन पाटील, कुंभी कासारी संचालक किशोर पाटील, गोकुळ कर्मचारी पतसंस्थेचे अध्यक्ष सचिन पाटील, अमृत महोत्सव गौरव समितीचे सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ, भागातील मान्यवर, विद्यार्थी पालक व आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू भोसले, स्वागत व प्रास्ताविक अनिल सोलापुरे यांनी केले. आभार आभार प्रदर्शन लोकनियुक्त सरपंच सचिन पाटील यांनी केले.