माजी सनदी अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांचे आज व्याख्यान
सावंतवाडी : प्रतिनिधी
स्वातंत्र्य सैनिक जयानंद मठकर स्मृती व्याख्यानमाला २०२५ अंतर्गत मंगळवार ८ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता 'जुने जाऊ द्या मरणालागूनी' या विषयावर पुणे येथील माजी सनदी अधिकारी, साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांचे व्याख्यान होणार आहे.
'राजा, तू चुकतो आहेस! सर्वसामान्य लोकांच्या भल्याचा विचार हाच खरा राजधर्म असतो, याचा तुला विसर पडला आहे...' अशा रोखठोक शब्दांत बडोदा येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना सत्ताधा-यांना खडे बोल सुनावणारे लक्ष्मीकांत देशमुख मंगळवारी सावंतवाडीत येत आहेत. अर्थातच, या व्याख्यानासाठीच खास. भूतकाळाचे, इतिहासाचे ओझे नकोसे झालेल्या या समाजाला आपल्या वर्तमानाची पाळंमुळं याच इतिहासात आहेत, याचा विसर पडू लागला आहे. इतिहास पुसून टाकला की सगळं सुरळीत होईल, असा संभ्रम जाणीवपूर्वक निर्माण करणा-या प्रवृत्तीही आजूबाजूला वावरत आहेत. त्यातूनच योग्य काय अयोग्य काय, याचे भान हरवत चालले आहे. समाजात दुहीचे आणि संशयाचे वातावरण वाढू लागले आहे. याच पार्श्वभूमीवर जाणत्या लोकांनी मौन पाळून आपल्याच कोशात राहण्याऐवजी ठाम भूमिका घेत बोलणे गरजेचे बनले आहे. लक्ष्मीकांत देशमुख यांचे व्याख्यान या विषयावरच आहे. सावंतवाडी श्रीराम वाचन मंदिर सभागृहात होणाऱ्या या वैचारिक मेजवानीचा लाभ घ्यावा, विचारप्रवण व्हावे, असे आवाहन श्रीराम वाचन मंदिरचे अध्यक्ष प्रसाद पावसकर, कार्याध्यक्ष संदीप निंबाळकर, सचिव रमेश बोंद्रे, प्रा. प्रवीण बांदेकर यांनी केले आहे.