Kolhapur : महापालिकेची आरक्षण सोडत 11 नोव्हेंबरला
कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर
कोल्हापूर : आगामी महापालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार ११ नोव्हेंबर २०२५ रोजी महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश कांकाणी यांनी यासंदर्भातील आदेश काढला आहे. यामध्ये कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिकांच समावेश आहे.
११ नोव्हेंबर रोजी आरक्षण सोडत काढून त्याच दिवशी त्यासंदर्भातील अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे मान्यतेसाठी सादर करण्याच्या सूचना आहेत २४ नोव्हेंबरपर्यंत हरकती मागवणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाने यासंदर्भातील कार्यक्रम स्पष्ट करताना म्हटले आहे की, ३० ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत आरक्षण जागांची संख्या निश्चित करून त्याला राज्य निवडणूक आयोगाची मान्यता घ्यायची आहे. आठ नोव्हेंबर २०२५ रोजी आरक्षण सोडत तारखेची सूचना प्रसिद्ध करायची आहे. ११ नोव्हेंबर रोजी आरक्षण सोडत प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
आरक्षणावर हरकती व सूचना मागवण्याचा कालावधी २४ नोव्हेंबर २०२५ पर्यंत आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेनंतर अंतिम आरक्षण सरकारच्या राजपत्रात दोन डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. ही सोडत कोल्हापूर महापालिका निवडणूक २० प्रभागातील ८१ नगरसेवकांच्या निवडीसाठी होणार आहे.
पाच वर्षाची प्रतीक्षा संपणार
पाच वर्ष महानगरपालिकेची निवडणूक झाली नाही. त्यामुळे आता लवकरच निवडणूक लागणार आहे. यामुळे इच्छुकांच्यात उत्साह निर्माण झाला आहे. यापूर्वी ही निवडणूक तीन वेळा जाहीर झाली होती. कार्यकर्त्यांनी तयारीही त्यावेळी केली होती. मात्र ओबीसी आरक्षणामुळे ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. यावेळी मात्र निवडणूक होणार असल्याचा विश्वास राजकीय पक्षांच्याबरोबर कार्यकर्त्यांच्यामध्येही आहे.
बॅनरबाजीतून झळकले इच्छूक
दिवाळीनंतर निवडणुका होणार असल्याचे संकेत इच्छुकांना मिळाले होते. यामुळे दिवाळीच्या डिजिटल बोर्डच्या शुभेच्छांनी शहर झाकले होते. महानगरपालिकेच्या नगरसेवक पदाच्या जागेसाठी शहरात दिसेल त्या जागेला इच्छुकांनी बॅनर चिकटवले होते. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच बॅनरबाजीत इच्छुकांची इर्षा दिसून आली.