राजकारण सोडून अध्यात्माच्या मार्गावर
काँग्रेस नेते लालचंद कटारिया यांची घोषणा
राजस्थानच्या अशोक गेहलोत सरकारमध्ये कृषिमंत्री लालचंद कटारिया यांनी विधानसभा निवडणूक लढविण्यास नकार दिला आहे. कटारिया यांनी काँग्रेस नेतृत्व आणि मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना याविषयी कळविले आहे. आता मी अध्यात्मावर लक्ष केंद्रीत करत असल्याचे म्हणत कटारिया यांनी मी स्वत: निवडणूक लढविणार नाही तसेच माझा कुठलाही कुटुंबीय निवडणुकीत उतरणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. कटारिया यांना मुख्यमंत्री गेहलोत आणि विधानसभा अध्यक्ष सी.पी. जोशी यांचे निकटवर्तीय मानले जातात. कटारिया यांचा मतदारसंघ झोटवाडा येथेच त्यांना मोठा विरोध आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्षनेतृत्वाकडे कटारिया यांना उमेदवारी न देण्याची मागणी केली होती. याचमुळे कटारिया यांनी स्वत:च निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केले आहे. यापूर्वी राज्य सरकारमधील पर्यावरण मंत्री हेमाराम चौधरी यांनी निवडणूक लढविणार नसल्याची घोषणा केली होती. माझा कुठलाही कुटुंबीय निवडणूक लढविणार नाही. राजकारणाचा आता उबग आला असून एखाद्या युवा नेत्याला उमेदवारी देण्याचे आवाहन पक्षनेतृत्वाला केले असल्याचे चौधरी यांनी म्हटले आहे.