अहंकार सोडा, ममतांचे नेतृत्व स्वीकारा
तृणमूल खासदाराचा काँग्रेसला सल्ला : इंडी आघाडीचे नेतृत्व सोपविण्याची मागणी
वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा पोटनिवडणुकीत सर्व 6 जागांवर विजय मिळविल्यावर तृणमूल काँग्रेसचा उत्साह दुणावला आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते आणि खासदार कल्याण बॅनर्जी यांनी काँग्रेसला बोचणारा सल्ला दिला आहे. काँग्रेसने स्वत:चा अहंकार बाजूला ठेवून ममता बॅनर्जी यांना इंडी आघाडीचे नेतृत्व सोपवावे असे म्हणत बॅनर्जी यांनी महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या पराभवावरून देखील काँग्रेसवर टीका केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला आव्हान देण्यासाठी एकीकृत आणि निर्णायक नेतृत्व देण्याची गरज आहे. ममता बॅनर्जी यांचे सिद्ध झालेले नेतृत्व आणि जनतेशी असलेल्या संबंधांमुळे त्या विरोधी पक्षांच्या आघाडीत सर्वात उपयुक्त नेत्या असल्याचा दावा कल्याण बॅनर्जी यांनी केला आहे.
काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी अलिकडच्या निवडणुकीत मिळालेल्या अपयशाला मान्य करावे आणि एकतेला वैयक्तिक महत्त्वाकांक्षेच्या वर ठेवावे. काँग्रेसने स्वत:चा अहंकार बाजूला ठेवावा आणि ममता बॅनर्जी यांना इंडी आघाडीचे नेते म्हणून मान्य करावे. एकीकृत आणि व्यवहारिक दृष्टीकोनाशिवाय विरोधी पक्षांचे प्रयत्न डळमळीत होत राहणार असल्याचे कल्याण बॅनर्जी यांनी म्हटले आहे.
ममता बॅनर्जी आदर्श चेहरा
ममता बॅनर्जी यांनी भाजपच्या विरोधातील लढाईत प्रभावी कामगिरी केली आहे. ममता बॅनर्जी यांना देशभरात एक योद्ध्याच्या स्वरुपात ओळखले जाते. त्यांचे नेतृत्व आणि जनतेशी जोडून घेण्याची क्षमता त्यांना इंडी आघाडीच्या नेतृत्वासाठी आदर्श चेहरा ठरवत असल्याचे उद्गार कल्याण बॅनर्जी यांनी काढले आहेत.
भाजपकडून निशाणा
काँग्रेसच्या पश्चिम बंगालमधील नेत्यांनी तृणमूल खासदाराच्या वक्तव्यावर टिप्पणी करण्यास नकार दिला. तर भाजपच्या नेत्याने इंडी आघाडीचे नेतृत्व बदलल्याने याचे राजकीय भवितव्य बदलणार नसल्याची उपरोधिक टिप्पणी केली आहे. काँग्रेस असो किंवा तृणमूल किंवा अन्य कुठलाही पक्ष इंडि आघाडीचे राजकीय भवितव्य बदलणार नाही, कारण देशाच्या जनतेने या पक्षांना नाकारले आहे असे भाजप प्रवक्ते समिक भट्टाचार्य यांनी म्हटले आहे.
पोटनिवडणुकीत निर्विवाद यश
पश्चिम बंगालमध्ये सर्व 6 विधानसभा जागांकरता झालेल्या पोटनिवडणुकीत तृणमूल काँग्रेसने विजय मिळविला आहे. आरजी वैद्यकीय महाविद्यालयातील घटनेवरून सुरू असलेल्या निदर्शनांनंतरही राज्यात तृणमूल काँग्रेसचा प्रभाव दिसून आला आहे. पक्षाने मदारीहाट मतदारसंघ भाजपकडून खेचून आणला आहे.