रात्रीचे मित्र सोडा, निसर्ग जपणाऱ्यांची संगत करा
मिरज :
नशामुक्त देश घडविण्यासाठी शासन विविध उपाययोजना राबवत असते. पण नशामुक्त पिढी घडून त्यांच्या हातून सत्कर्म घडवायचे असेल, तर तरुणांनो रात्रीचे मित्र सोडा आणि सकाळचे मित्र जोडा. रात्री नशेत गुरफटण्यापेक्षा सकाळी निसर्गाचा आनंद लुटणाऱ्यांची आणि निसर्ग जपणाऱ्यांची संगत करा, असे आवाहन अभिनेते सयाजी शिंदे यांनी केले.
नशामुक्त भारत अभियानांतर्गत शुक्रवारी अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते मिरज शासकीय वैद्यकीय रुग्णालय आणि महात्मा गांधी चौकी पोलिस ठाण्यात वृक्षारोपण झाले. सयाजी शिंदे यांच्या मुलाखतीचाही कार्यक्रम घेण्यात आला. भारत सरकाने नशामुक्त देश घडविण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. हे अभियान केवळ निमितमात्र आहे. पण तरुणांनी स्वतःहून नशेपासून दूर राहिले पाहिजे, असे आवाहन केले.
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून शासकीय रुग्णालय आणि गांधी चौकी पोलिस ठाणे परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. वैद्यकीय कर्मचारी व पोलिस कर्मचाऱ्यांना अभिनेते सयाजी शिंदे यांनी निसर्ग संवर्धनाची शपथ दिली.
शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. रुपेश शिंदे यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामार्फत एक हजार वृक्ष दुष्काळी भागाला देण्याची घोषणा केली. अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरुव यांच्यासह सिव्हीलचे अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
गांधी चौकी पोलिस ठाण्याला सयाजी शिंदे यांनी सदिच्छा भेट देऊन कामकाजाची माहिती घेऊन समाधान व्यक्त केले. गांजा, नशेच्या गोळ्या व अंमली पदार्थ तस्करीविरुध्द गांधी चौकी पोलिसांनी प्रभावी मोहिमेद्वारे प्रतिबंध घालण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल कौतुक केले. सर्वांनी एकत्र येऊन नशामुक्त देश घडवूया, असे आवाहन सयाजी शिंदे यांनी यावेळी केले.