इराणची साथ सोडा, अन्यथा स्वातंत्र्य विसरा
लेबनॉनला इस्रायलकडून जाहीर इशारा
इराण युद्ध सुरू असताना लेबनॉनमधून हिजबुल्लाह ही दहशतवादी संघटना इस्रायलवर सातत्याने रॉकेट आणि क्षेपणास्त्रs डागत आहे. याचदरम्यान इस्रायलचे विदेशमंत्री गिदोन सार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे लेबनॉनच्या राजकारणावर मोठे प्रश्न उपस्थित राहिले आहेत.
लेबनॉनच्या विदेश मंत्रालयाने मागील आठवड्यात इराणच्या राजदूताला ‘पर्सोना नॉन ग्राटा’ घोषित करत देश सोडण्यासाठी मुदत दिली होती. ही मुदत 29 मार्च रोजी संपुष्टात आली. परंतु 30 मार्च रोजी सकाळी इराणचे राजदूत बैरुतमध्ये बसून आरामात चहा पित होते. इस्रायलचे विदेशमंत्री सार यांनी इराणचा राजदूत बैरूतमध्ये बसून यजमान देशाची थट्टा उडवत असल्याची टिप्पणी केली आहे.
लेबनॉन हातचे बाहुले
लेबनॉन नावापुरती देश असून प्रत्यक्षात तो इराणचा कब्जा आहे. हा कब्जा लपून राहिलेला नाही तर उघड आहे. परंतु जग यावर बोलू इच्छित नाही. 2 मार्च रोजी हिजबुल्लाहने नोव्हेंबर 2024 च्या शस्त्रसंधीला तोडत इस्रायलवर हल्ला केला होता. तेव्हापासून लेबनॉनच्या भूमीवरून इस्रायलवर 5 हजारांहून अधिक क्षेपणास्त्रs, रॉकेट आणि ड्रोन्स डागण्यात आल्याचे सार यांनी निदर्शनास आणून दिले.
इस्रायलचा थेट इशारा
जोपर्यंत लेबनॉन इराणचा कब्जा आणि हिजबुल्लाहचा सामना करण्याचा निर्णय घेत नाही तोवर लेबनॉनला स्वत:चे सार्वभौमत्व परत मिळणार नसल्याचे सार यांनी स्पष्ट केले आहे. इस्रायलने लेबनॉनमध्ये ग्राउंड ऑपरेशन राबवत लिटानी नदीपर्यंतच्या भागावर कब्जा करण्याची घोषणा केली आहे. युद्धात अडकलेल्या लेबनॉनसाठी हे वक्तव्य म्हणजे एक स्पष्ट संदेश आहे की इस्रायल आता जुन्या स्थितीत परतण्यास तयार नाही.