For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विचार करण्याचे शिक्षण

06:30 AM Feb 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
विचार करण्याचे शिक्षण
Advertisement

ससा आणि कासव’ यांची गोष्ट तीन वाक्यात सांगण्यास आठवीच्या विद्यार्थ्यांना सांगितल्यावर त्यांना तो प्रश्न फारच सोपा वाटला पण तीन वाक्यात एखादी गोष्ट सांगणे अवघड आहे, याचे थोड्याच वेळात सर्वच मुलांना प्रत्यंतर आले.  कोणत्याही सिनेमाची कथा, नाटकाची कथा, कोणतीही गोष्ट तीन वाक्यात सांगण्यासाठी भाषेवर प्रभुत्व आवश्यक आहेच शिवाय स्वतंत्रपणे विचार करण्याची कुवतही लागते.

Advertisement

शालेय शिक्षणामध्ये सहसा विचार करून व्यक्त होण्यास सांगितले जात नाही. त्यामुळे अनेक गोष्टींचे ठराविक अनुमान/निष्कर्ष शालेय विद्यार्थ्यांना तोंडपाठ असतात. ‘ससा आणि कासव’ या गोष्टीमध्ये कोणाचे काय चुकले, यावर ससा आळशी होता हे ठराविक उत्तर येते पण ससा आणि कासवाची शर्यत लावणारे चुकले आहेत, खरा दोष त्यांचा आहे असे कोणीच सांगत नाही. दोन कासवांची शर्यत लावता येते, अनेक सशांची शर्यत लावता येते पण वाघ आणि शेळी यांची ‘अनलिमिटेड मिसळ’ खाण्याची स्पर्धा कशी लावता येईल? ‘ससा आळशी होता’ हे ठराविक उत्तर मिळाल्यावर पालक-शिक्षकांना कृतकृत्य झाल्यासारखे वाटते पण मुला-मुलींना स्वत:चा विचार करण्यास कोणी प्रवृत्त करत नाही. त्यामुळे हीच गोष्ट दुसऱ्या दिवशी सांगून त्याचा शेवट वेगळा करण्यास मुला-मुलींना प्रवृत्त केल्यास वेगळा विचार करण्यास सुरुवात होईल.

‘सिंह आणि ससा’ यांची गोष्ट सर्वच शालेय विद्यार्थ्यांनी ऐकलेली असते.  जंगलातील प्राण्यांना खाणाऱ्या सिंहाला अद्दल घडवणारा ससा सिंहाला जंगलचा नवीन राजा विहिरीत दाखवतो आणि त्याचा खात्मा करण्यासाठी सिंह विहिरीत उडी घेऊन मारतो. या गोष्टीमध्ये दुष्ट कोण? सर्वच शाळातील सर्वच विद्यार्थी एकमुखाने सिंहाला दुष्ट ठरवतात. याचे कारण विचारल्यावर “सिंह प्राण्यांना मारून खातो” असे सांगितले जाते. यावर “तुमच्यापैकी चिकन/अंडी खायला कोणाला आवडते?” असा प्रश्न विचारल्यावर काही मुले हात वर करतात. “तुम्ही दुष्ट आहात का?” असे विचारल्यावर मुले नकारार्थी मान डोलावतात पण सिंह दुष्ट कसा, यावर निरुत्तर होतात. प्राणी मारून खाणे सिंहाचा धर्म आहे आणि पोट भरलेले असताना जंगलातील प्राणी उगाचच कोणाला मारून खात नाहीत. हा मुद्दा बाजूला ठेवून “कोणी कोणाला फसवले?” असा प्रश्न विचारल्यावर विद्यार्थी-विद्यार्थिनी “सशाने सिंहाला फसवले” असे उत्तर देताना बिचकतात. ही चर्चा केल्यानंतर या गोष्टीला उत्तम मथळा देण्यास सांगितल्यावर ठराविक उत्तरेच येतात.

Advertisement

गणपती आणि कार्तिकेय या दोन मुलांना जगाची प्रदक्षिणा घालण्यास सांगितल्यानंतर कार्तिकेयाने जगाची प्रदक्षिणा घालण्यासाठी कूच केले परंतु गणपतीने चतुराईने आई-वडिलांना प्रदक्षिणा घातली आणि शर्यत जिंकली. या गोष्टीचे अनुमान साचेबद्ध रीतीने सांगितले जाते परंतु शर्यत खऱ्या अर्थाने कोणी पूर्ण केली, या प्रश्नावर सगळेच विद्यार्थी गप्प बसतात. पुराणातील वानगी साचेबद्ध रीतीने सांगण्याची सवय लागल्यामुळे त्यावर विचार कोणीच करत नाही आणि मुले प्रश्न विचारत नाहीत. शालेय शिक्षकांना/पालकांना/खेळातील पंचांना प्रदक्षिणा घातल्यामुळे कोणतीही शर्यत कशी जिंकता येईल? असा निर्णय देणारे चुकले की खरेच जगाची प्रदक्षिणा घालणारा चुकला, यावर विचार करणारे विद्यार्थी आपल्याकडे कधी तयार होणार? ‘टोपीवाला आणि माकड’ या गोष्टीमध्ये टोपीवाल्याचा नातू टोप्या विकायला गेला तर पुढे काय होईल? अशा अनेक नातवांच्या गोष्टीवर वेगळ्या पद्धतीने विचार करू पाहणाऱ्या गोष्टी राजीव तांबे यांच्या ‘खरंच असं झालं तर’ या पुस्तकात आहेत. या पद्धतीने पालकांनी मुलांना गोष्टी सांगून त्यांना वेगळ्या गोष्टी तयार करण्यास प्रवृत्त करणे आवश्यक आहे. अलिबाबा आणि चाळीस चोरांची गोष्ट आताच्या कॉम्प्युटर जमान्यात तयार करण्यास मुलांना तयार करता येईल आणि ‘खुल जा सीम सीम’ च्या ऐवजी कॉम्प्युटरचा पासवर्ड विसरण्याची क्लुप्ती वापरून पूर्ण गोष्ट बदलता येईल.

प्रवाहाबरोबर वहात जाणारी पुढची पिढी तयार करावी की प्रवाहाच्या विरुद्ध पोहणारी? अंतराळात गेल्यावर ग्लासला तोंड न लावता पाणी पिणे शक्य आहे का? मी या शाळेचा मुख्याध्यापक झालो तर या शाळेसाठी वेगळे काय करीन? रस्त्याच्या उजव्या बाजूने वाहने चालवणे बंधनकारक केले तर काय होईल? शाळेच्या उन्हाळी सुट्ट्या बंद करून पावसाळ्यात सुट्ट्या दिल्या तर? मी शिक्षणमंत्री झालो तर कोणते पाच नवे विषय शाळेमध्ये शिकवण्यास बंधनकारक करेन? बिरबल अधिक हुशार की बिरबलासारखी नऊ रत्ने दरबारामध्ये निवडणारा गुणग्राहक अकबर हुशार? सर्व विद्यार्थ्यांना पुस्तके हातात घेऊन प्रश्नांची उत्तरे लिहिण्याची मुभा दिल्यास प्रश्नपत्रिका कशी तयार करावी? पाकिस्तानमध्ये आपल्याच इयत्तेमध्ये शिकणारे पाच विद्यार्थी भेटले तर त्यांना कोणते तीन प्रश्न विचारावेत? मेंदूला चालना देणारे असे असंख्य प्रश्न विचारता येतील.

प्रवासाला निघताना कपड्यांच्या घड्या वेगळ्या पद्धतीने करण्यास इयत्ता तिसरीपासून पाचवीच्या विद्यार्थ्यांना सांगता येईल. नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांना कुटुंबाचा दरमहा होणारा खर्च सांगून त्यापेक्षा निम्म्या खर्चात एखादा महिना काढायचा असल्यास कोणते खर्च कमी करता येतील, यावर चर्चा करता येईल.  वेगवेगळ्या कारची आवड असणाऱ्या मुलींना नवीन कारचे डिझाईन करण्यासाठी पाच अभिनव कल्पना विचारता येतील.  ड्रेनेजचे झाकण गोल का असते (चौकोनी का नसते), वाघ शाकाहारी झाला तर काय होईल, जगातील सर्व माणसांनी शाकाहार करण्यास सुरुवात केली तर काय होईल, शाळेत न जाता घरामधून शिक्षण पूर्ण केले तर काय चांगले आणि काय वाईट होईल, आई महिनाभर संपावर गेली तर काय होईल, अचानक एक कोटी रुपये मिळाले तर काय करता येईल, अशा प्रश्नांवर मुलांना बोलते करता येईल.  आजच्या काळात मोबाईल नेटवर्क महिनाभर बंद पडले तर काय होईल, कॉम्प्युटरशिवाय आजचे जग कसे असेल अशा प्रश्नांवर स्वप्नरंजन करताना शालेय विद्यार्थ्यांना अनेक कष्ट पडतात कारण कल्पनाविलास असणारे निबंधसुद्धा आज विद्यार्थ्यांना स्वत: लिहावे लागत नाहीत. त्यांना शिक्षक-पालक मदत करतात किंवा त्याची अनेक रेडीमेड पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत.

भोर तालुक्यातील आळंदे येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये वाचन वर्ग घेत असता “शिवाजी महाराजांची गोष्ट कोण सांगणार?” असे विचारल्यावर सहावीमध्ये शिकणारा सार्थक पुढे आला. त्याने आग्dरयाहून सुटकेची गोष्ट सांगितली.  त्यावर त्याला “हीच गोष्ट तू स्वत: शिवाजी महाराज आहेस असे समजून सांगणार का?” त्याने तत्परतेने होकार दिला. “आम्ही आग्dरयाला निघालो होतो, माझ्यासोबत मुलगा संभाजी होता...” असा बदल करून गोष्ट सांगितली. त्यावर सार्थकला विचारले, “महाराज, पेटाऱ्यात लपला होता, तेव्हा तुमचा जीव गुदमरला नाही का?”. सार्थक म्हणाला, “नाही, आम्ही पेटाऱ्याला खालून भोके पाडली.” चौकटीबाहेर विचार करण्याची कुवत प्रत्येकाकडे असते पण तशी संधी देण्याचे काम पालक-शिक्षकच करू शकतात.

-सुहास किर्लोस्कर

Advertisement
Tags :

.