महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

निर्णय घेण्याचे शिक्षण

06:03 AM Jan 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

शालेय शिक्षणामध्ये बहुतांश प्रश्न एकच ठराविक उत्तर असणारेच विचारले जातात. शालेय वर्गात वाचनाचे किंवा अभ्यास कसा करावा या विषयी वर्ग घेताना बुद्धीला चालना देणारे पण एकच ठराविक उत्तर न असणारे प्रश्न एका आठवीच्या वर्गात विचारले, ‘शाळेत आपण का येतो?’ यावर ‘अभ्यास करायला’ असे उत्तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी दिले. काही मुलांनी ‘खेळण्यासाठी’ असे उत्तर दिले. ते उत्तर ऐकून वर्गशिक्षिकांनी डोळे मोठे केले. ‘शिक्षण घेण्यासाठी’ असे उत्तर कोणीच पहिल्यांदा दिले नाही, त्यामुळे त्यांना राग आला होता. एका बालक-पालक सभेमध्ये हा प्रश्न विचारल्यानंतर दुसरा प्रश्न विचारला, “तुम्ही शाळेतून घरी का येता?”. या प्रश्नावर सभागृहांमध्ये बराच वेळ शांतता होती. काही मुलांनी ‘जेवायला’, ‘झोपायला’, ‘आमचे कपडे घरात असतात’. आई-वडिलांना अपेक्षित असलेले उत्तर न दिल्यामुळे अनेक पालक नाराज झालेले स्पष्ट दिसले. एका शाळेमध्ये नववीच्या वर्गात प्रश्न विचारला, ‘रस्त्यावरून चालणारी एखादी व्यक्ती शिकलेली आहे की नाही, हे त्या व्यक्तीला न विचारता कसे ओळखाल?’ या प्रश्नावर, ‘वेशभूषेवरून’, ‘त्याची भाषा शुद्ध आहे की नाही यावरून’,  त्याच्याकडे किती पैसे आहेत त्यावरून, तो कसा चालतो, यावरून अशी अनेक उत्तरे आली.  शुद्ध भाषा म्हणजे नेमके काय, कपड्यांचा आणि शिक्षणाचा काय संबंध असतो, शालेय शिक्षण आणि खिशात किती पैसे आहेत याचा काय संबंध आहे? अशा मुद्यांवर चर्चा झाल्यावर एक विद्यार्थी म्हणाला, ‘याचे अपेक्षित उत्तर काय आहे?’

Advertisement

एकूणच शालेय शिक्षण पद्धती अपेक्षित प्रश्नांना एकच अपेक्षित उत्तर यावर पोसलेली आहे. ज्या प्रश्नांची अनेक उत्तरे असू शकतात, असे स्वत:चे मत व्यक्त करण्याची शक्यता असणारे प्रश्न शाळेत विचारले जात नाहीत. मुळात शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींनी स्वत:चे मत बनवू नये यासाठी पालक आणि शिक्षक अथक प्रयत्न करत असतात. नववी-दहावीच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य घरामध्ये अथवा शाळेमध्ये नसतेच शिवाय निर्णय घ्यावे लागतील, असे प्रश्नच विचारलेले नसतात. बऱ्याच मुलांनी लहानपणी ‘तुला यातले काही समजणार नाह़ी’ हे वाक्य बरेचवेळा ऐकलेले असते. अनेक मुलींना आणि एकूणच घरातील  स्त्रियांना निर्णय घेण्यास शिकवले जात नाही.

Advertisement

शाळेमधून घरी आल्यावर काय चित्र दिसते?

‘आई, मी भाजी आणू?’

‘नको, तुला त्यातले काही कळणार नाही’

‘मला दोनशे रुपये दे, मी आणतो चार भाज्या’

‘नको, तुला भाजीवाले फसवतील’

हा संवाद घरोघरी होणारा आहे. यासाठीच मुलांना वाढत्या वयामध्ये कोणती समज केव्हा येते, बालकाची आकलन शक्ती कशी वाढते, हे पालकांनी समजून घेणे आवश्यक आहे. गंध समजणे, आकारामधील वैविध्य समजणे, चव, ऐकण्याची कला (सांगितलेले ऐकण्याची नव्हे), स्पर्श यामधील बारकावे वयाच्या दोन वर्षांच्या मुला-मुलीला समजू शकतात. रांगणे, चालणे, पळणे या शारीरिक क्रिया जमल्यावर बालक त्याच्याच दृष्टीकोनातून जगाकडे बघू लागते. म्हणजेच आपण एखादी कृती केल्यानंतर दुसऱ्याला काय वाटेल, असा विचार बालक करू शकत नाही. वयाच्या सातव्या वर्षापर्यंत बालकाला इतरांचे बोलणे समजू लागते, खाणा-खुणा ओळखता येतात, न बोलता हातांच्या हालचाली करून काही सांगितले, तर ते समजते. वयाच्या चौथ्या वर्षापासून मुले-मुली प्रश्न विचारण्यास सुरुवात करतात.  अनेकांच्या शरीरातील फरक, वातावरणातील बदल, झाडांचे विविध प्रकार, चाक पळते कसे, धबधब्यावरून पाणी खाली का पडते असे असंख्य प्रश्न या वयापासून पडतात.  इथे जर पालकांनी उत्तरे दिली नाहीत, दटावणीची भाषा वापरली तर कुतूहल मरून जाते. सातव्या वर्षापासून वयाच्या अकराव्या वर्षापर्यंत विविध आकारापैकी आपला आवडता कोणता, चढता उतरता क्रम, काही प्रश्न तर्काने सोडवणे याच टप्प्यावर मुले शिकतात. इथेच निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिल्यास त्यांना ठरवता येते की पाच पैकी कोणत्या भाज्या विकत घ्याव्यात, कोणत्या रंगाचा कंपास असावा, वहीचे मुखपृष्ठ कोणते असावे, वगैरे.

वयाच्या बाराव्या वर्षापासून तर्कशुद्ध विचार करण्याची कुवत मुला-मुलींमध्ये येत असते.  योग्य काय, अयोग्य काय, समोरची व्यक्ती अशा पद्धतीने का वागते आहे, यासंबंधी इयत्ता सहावीच्या पुढील विद्यार्थी-विद्यार्थिनीना विचार करता येतो.  तीन वेगवेगळी वाक्ये एकत्र करून वाचणे आणि त्याचा संबंध लावून कोणती कृती करावी याबद्दल निर्णय घेणे, स्वत:चे टाईमटेबल तयार करणे, दिवसाचे नियोजन करणे, समोरच्या व्यक्तीला काय वाटते यासंबंधी विचार करून वागणे, हे सर्व याच वयामध्ये मुले-मुली शिकतात. परंतु त्यांना तसे स्वातंत्र्य देण्याची गरज असते.  “तू अजून लहान आहेस” हे वाक्य ज्यांना रोज ऐकून घ्यावे लागते, त्या मुली साधे निर्णय घेऊ शकत नाहीत.

कोणते मित्र/मैत्रिणी असावे याबद्दल मुला-मुलींचे स्वत:चे मत असते परंतु आपल्या मुला-मुलींनी कोणाशी मैत्री करावी यासंबंधी पालक निर्णय घेतात किंवा पालकांना न आवडणाऱ्या मित्र-मैत्रिणीसंबंधी शेलकी टोमणे मुलांना ऐकून घ्यावे लागतात. ‘असला कसला रे तुझा मित्र, त्याचे इंग्लिश फारच कच्चे दिसतेय’, ‘किती गबाळी दिसते तुझी मैत्रीण’ अशी पालकांची वाक्ये लहानपणापासून ऐकता ऐकता मुले मोठी होतात. आपल्या पाल्याने आपल्याच जाती-धर्मातील, आपल्याच आर्थिक स्तरातील, आपल्याच ‘लेव्हल’चे मित्र जमवावेत अशी पालकांची अपेक्षा असते. पालकांचे शेरे ऐकल्यामुळे आपल्याला स्वत:चे मित्र निवडता येत नाहीत,  आपल्याला आर्थिक व्यवहार जमत नाहीत, आपल्याला रस्ते माहित नाहीत, आपल्याला एकट्याने कुठेही जाता येत नाही अशाप्रकारची पक्की धारणा होत राहते आणि निर्णय घेण्याची क्षमता लुप्त होते. वयाच्या पाच ते बारा वर्षाच्या काळामध्ये मुले-मुली स्वत:ची आवड-निवड काय आहे याबद्दल सतर्क असतात.  याच काळात ते आपण इतरांपेक्षा वेगळे कसे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करतात.  याच काळामध्ये ‘तुला काही समजत नाही’ अशी वाक्ये ऐकल्यामुळे मुलांच्या मनावर विपरीत परिणाम होतो. अशा परिस्थितीमध्ये वाढलेल्या मुला-मुलींना दहावीनंतर काय करावे यासंबंधी निर्णय घेण्यासाठी पालक-शिक्षक आणि समाज यावर त्यांना अवलंबून रहावे लागते.

मुला-मुलींना घर एकटे सांभाळण्याची जबाबदारी देणे, त्यांना एकटेच प्रवासाला पाठवणे, त्यांच्यावर विश्वास टाकून त्यांना काही कामे करण्याची जबाबदारी देणे असे प्रयोग केल्याशिवाय मुले समंजस होत नाहीत. निर्णय घेण्याचे शिक्षण देताना पालकांनी मुला-मुलींना प्रश्न विचारताना त्याचे उत्तर निवडण्याकरीता चार-पाच पर्याय द्यावेत. ‘तुला अभ्यास करायला आवडतो ना?’ अशा प्रश्नांमध्येच उत्तरे दडलेली असतात, असे प्रश्न कधी विचारू नयेत. पैशाचे व्यवहार समजण्यासाठी आठ-दहा वर्षाच्या मुला-मुलीला पाचशे रुपये देऊन सुपर मार्केटमधून काहीही विकत घेण्यास सांगावे पण त्याने केलेल्या निवडीवर टीका-टिप्पणी करू नये.

अतूग्दह म्हणजेच अधिकार सुपूर्त करण्याची कला आपल्याकडे शिकवली जात नाही. ज्येष्ठ माणसे पुढच्या पिढीला अधिकार देत नाहीत. लग्न झालेल्या पुढच्या पिढीला घरातील सर्व निर्णय घेण्याचे अधिकार दिले जात नाहीत.  त्याचप्रमाणे आई-वडील लहान मुलांकडेही कार्यभार सोपवत नाहीत. त्यामुळे त्यांच्या पंखांमध्ये बळ येत नाही. लहानपणीच मुलांनी स्वतंत्रपणे रहावे यासाठी शाळेत पाठवण्यापूर्वी म्हणजे चार-पाच वर्षे वयाच्या मुलाला जवळच्या नातेवाईकांकडे चोवीस तास राहण्यासाठी पाठवावे. पंधरा वर्षे वयाच्या मुला-मुलीकडे घराचा पूर्ण कार्यभार सोपवून आई-वडिलांनी लांब फिरायला जावे आणि घर कसे सांभाळावे याच्या सूचना देण्यासाठी रोज फोन करू नये. शाळेची सहल कुठेही असल्यास सहलीच्या काळात पालकांनी त्या मुला-मुलींना कधीही फोन करू नये तसेच सहलीचे नियोजन करणाऱ्या शिक्षकांना रोज फोन करून त्रास देऊ नये. निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिलेल्या आणि अधिकार सुपूर्त केलेल्या वातावरणात वाढलेली मुले/मुली स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकतात.

सुहास किर्लोस्कर

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article