भाड्याने शिका ‘शहाणपणा’
सांप्रतच्या काळात जगभरात ‘सेवाक्षेत्रा’चा विस्तार कल्पनातीत वाढला आहे. आपण विचारही करु शकणार नाही, अशा प्रकारच्या सेवा आपल्याला बाजारात मिळू लागल्या आहेत. काही दशकांपूर्वी ज्या सेवा कोणाला सुचल्याही नसत्या या आता बाजारात उपलब्ध आहेत आणि अशा सेवा पुरविणाऱ्यांचा व्यवसाय धडाक्यात चालला असल्याचेही दिसून येते. आपल्याला ‘शहाणपणा’ शिकविणाऱ्या किंवा आपली भरकटलेली बुद्धी योग्य मार्गावर आणण्याची सेवा उपलब्ध आहे.
वास्तविक अशी सेवा समुपदेशकांकडून दिली जाते. आपल्याला काही समस्या असेल तर समुपदेशक त्या समस्येवर उपाय सुचविण्याचा प्रयत्न करतात. तथापि, अमेरिकेतील एका कंपनीने जो सेवा प्रकार शोधला आहे, तो या श्रेणीतील नाही. काही लोक आपल्यावर आवाज करणाऱ्यांना प्रत्युत्तर देऊ शकत नाहीत. अशा लोकांना मुखदुर्बळ म्हणून ओळखले जाते. ही कंपनी अशा लोकांसाठी भांडण्याचे काम करते. कोणाला ओरडायचे असेल तर ही कंपनी साहाय्य करते. यासाठी कंपनीकडून आपल्याला भाड्याने माणूस घ्यावा लागतो. तो आपल्या वतीने इतरांशी भांडतो किंवा त्यांना दमात (शाब्दीक पद्धतीने) घेतो. त्यामुळे स्पष्ट बोलण्यास भांडण्यास कचरणाऱ्या माणसांची मोठी सोय होते. या कंपनीचे नाव ओसीडीए असून ती कॅलिमार व्हाईट नामक कल्पक व्यक्तीने स्थापन केली आहे. व्हाईट हे प्रथम एक स्टँडअप कॉमेडियन होते. पण समाजातील कित्येक व्यक्तींची ही आवश्यकता लक्षात घेऊन त्यांनी ही कंपनी स्थापन केली. या कंपनीच्या लोकांना भाड्याने घेण्यासाठी आपल्याला अर्थातच त्यांना प्रसंग आणि सर्व माहिती द्यावी लागते. त्यानंतर कंपनीच्या वतीने आपल्या समस्येचा अभ्यास केला जातो आणि त्यानुसार योग्य त्या व्यक्तीला भाड्याने पाठविले जाते, असे कंपनीचे म्हणणे आहे.