लिएंडर पेस भाजपमध्ये सामील
बंगाल निवडणुकीत मिळणार भूमिका : शहरी मतपेढीला आकर्षित करण्याचा प्रयत्न
वृत्तसंस्था/ कोलकाता
भारताचा दिग्गज टेनिसपटू लिएंडर पेस यांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी ही अत्यंत महत्त्वाची घटना मानली जातेय. कोलकात्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितिन नवीन यांच्यासोबत पेस यांची भेट झाल्यावर हा प्रवेश घडला आहे. पेस यांच्यासाठी पक्षीय राजकारण नवे नाही, 2021 मध्ये त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तर 2022 च्या गोवा विधानसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी तृणमूल काँग्रेससाठी प्रचारही केला होता. परंतु त्यांनी स्वत: निवडणूक लढविली नव्हती. आता भाजपमध्ये सामील होण्याचा त्यांचा निर्णय थेट निवडणुकीत उतरण्याचा संकेत असू शकतो.
माझी आई बंगाली असून माझा जन्म बंगालमध्येच झाला आहे. माझ्या काळात क्रीडाक्षेत्रासाठी सुविधा नव्हत्या आणि आजही बंगला आणि तामिळनाडूत सुविधा सुधारल्या जाऊ शकतात, मुलांना सशक्त अन् प्रेरित करण्याची आवश्यकता असल्याचे वक्तव्य लिएंडर यांनी केले आहे.
भाजपसाठी बंगालमध्ये सर्वात मोठे आव्हान कोलकाता आणि त्याच्या आसपासच्या शहरी भागांमधील तृणमूलचे वर्चस्व मोडून काढण्याचे आहे. नितिन नवीन यांनी यावेळी ‘स्टार पॉवर’ आणि ‘स्वच्छ प्रतिमे’चे मिश्रण तयार केले आहे. लिएंडर पेस यांचा जन्म कोलकात्यात झाला होता आणि ते शहराचे आयकॉन आहेत. त्यांचा भाजपप्रवेश मध्यमवर्गीय बंगाली आणि युवांदरम्यान पक्षाची स्वीकारार्हता वाढवू शकतो.
ममता बॅनर्जी या भाजपला ‘बाहेरील’ ठरवतात, पेस यासारख्या भूमिपुत्र आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उज्जवल करणाऱ्या चेहऱ्याद्वारे भाजप हा नॅरेटिव्ह बदलू इच्छितो. ममता बॅनर्जी यांच्यासाठी हा वैयक्तिक आणि राजकीय दोन्ही दृष्टीकोनातून झटका आहे. पेस यांच्या भाजप प्रवेशामुळे दक्षिण कोलकाता आणि जादवपूर यासारख्या क्षेत्रांमध्ये तृणमूलच्या शहरी मतपेढीला सुरुंग लागू शकतो.