For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आबासोव्हला नमवून गुकेश नेपोम्नियाचीसह आघाडीवर

06:43 AM Apr 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
आबासोव्हला नमवून गुकेश नेपोम्नियाचीसह आघाडीवर
Advertisement

कँडिडेट्स बुद्धिबळ : प्रज्ञानंद, विदित गुजराथीच्या लढती बरोबरीत

Advertisement

वृत्तसंस्था/ टोरँटो

प्रतिष्ठेच्या कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेत रशियाचा इयान नेपोम्नियाचीसमवेत संयुक्तपणे अग्रस्थान मिळविणारा डी. गुकेश हा पाचव्या फेरीत विजय मिळवणारा एकमेव भारतीय राहिला. त्याने अझरबैजानच्या निजात आबासोव्हचा येथे झालेल्या अत्यंत चुरशीच्या लढतीत पराभव केला.

Advertisement

गुकेशचे पारडे या लढतीत सुरुवातीपासून जड राहिले होते. पण 40 व्या चालीवर त्याने चूक केली आणि त्याला सहज जिंकता येईल असा वाटणारा सामना कठीण बनला. आबासोव्हने त्यानंतर जोरदार झुंज दिली आणि 80 वी चाल खेळली जाईपर्यंत तो बरोबरी साधण्याच्या जवळ आला होता. परंतु 83 व्या चालीवर अझरबैजानच्या खेळाडूने केलेली चूक त्याला महागात पडली आणि सामना गुकेशच्या बाजूने झुकला. हा सामना 87 चाली इतका चालला.

दुहेरी राऊंड-रॉबिन पद्धतीने खेळविण्यात येणाऱ्या या स्पर्धेत नऊ फेऱ्या अजून बाकी असताना गुकेश आणि नेपोम्नियाची हे 3.5 गुणांसह अव्वल स्थानावर आहेत आणि त्यांच्यापाठोपाठ असलेला अव्वल मानांकित अमेरिकेचा फॅबियो काऊआना अर्ध्या गुणाने मागे आहे. अमेरिकेचा हिकारू नाकामुरा हा फ्रान्सच्या फिरोजा अलीरेझाला पराभूत करून कालच्या दिवशी विजय मिळविणारा दुसरा खेळाडू ठरला.

दुसरीकडे, भारतीय बुद्धिबळपटू आर. प्रज्ञानंदने नेपोम्नियाचीविरुद्धची लढत बरोबरीत सोडविली. तसेच विदित गुजराथीनेही काऊआनासोबत बरोबरी साधत आपली पराभवांची मालिका खंडित केली. प्रज्ञानंद आणि नाकामुरा 2.5 गुणांसह चौथ्या स्थानावर आहेत आणि गुजराथी दोन गुणांसह त्यांच्या मागोमाग आहे. अलीरेझा आणि आबासोव्ह प्रत्येकी 1.5 गुणासह शेवटच्या स्थानावर आहेत.

महिलांच्या स्पर्धेत चारही सामने अनिर्णीत राहिल्याने स्थिती बदलली नाही. प्रज्ञानंदची बहीण आर वैशाली ही अॅना मुझीचुकच्या बचावाला भेदू शकली नाही, तर कोनेरू हम्पीने रशियाच्या अॅलेक्झांड्रा गोर्याचकिनाविऊद्ध बरोबरी साधली. आघाडीवर असलेल्या चीनच्या झोंगी टॅनला बल्गेरियाच्या नुरग्युल सलीमोव्हाने बरोबरीत रोखले आणि रशियाच्या कॅटेरीना लागनोने देखील चीनच्या टिंगजी लेईबरोबरचा सामना बरोबरीत सोडविला.

सध्या टॅन 3.5 गुणांसह आघाडी कायम ठेवून आहे, तर तिच्यामागोमाग असलेल्या गोर्याचकिनाचे 3 गुण झाले आहेत. लागनो, वैशाली आणि सलीमोव्हा 2.5 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहेत. हंपी, मुझीचुक आणि लेई यांच्यापेक्षा त्या अर्ध्या गुणाने पुढे आहेत.

Advertisement

.