For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नेत्यांची हवेत पतंगबाजी तर उमेदवारांना धास्ती कापाकापीची

06:36 AM Jan 13, 2026 IST | Tarun Bharat Portal
नेत्यांची हवेत पतंगबाजी तर उमेदवारांना धास्ती कापाकापीची
Advertisement

राज्यातील 29 महापालिकांसाठी येत्या 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. 29 महापालिकांमध्ये एकूण 2869 जागांसाठी मतदान होत आहे. या निवडणूक प्रक्रियेसाठी 24 हजार 771 उमेदवारांनी अर्ज भरले, तर आठ हजार 840 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यात महत्वाची बाब म्हणजे कधी नव्हे ते 69 जण बिनविरोध निवडून आले. बिनविरोध निवडून येण्याचा मुद्दा चांगलाच गाजला, मात्र आता प्रचाराच्या रणधुमाळीत तो मागे पडला. मतदान अवघ्या काही तासांवर आलेले असताना, आता निवडणूक ही स्थानिक मुद्यांवर रंगताना दिसत आहे. महायुतीतील मित्रपक्षातील नेतेच एकमेकांच्या विरोधात वर्चस्वासाठी लढत असल्याचे एकीकडे दिसत आहे तर दुसरीकडे ठाकरे बंधू आणि शरद पवार अशा प्रादेशिक नेत्यांची शिवशक्तीने मुंबईत भाजपसमोर मराठी अस्मितेच्या मुद्यावऊन आव्हान निर्माण केले आहे. सध्या राजकीय नेत्यांची पतंगबाजी जोरात सुरू असली तरी, उमेदवारांना मात्र मतदान कापाकापीच्या धास्तीने जमिनीवर संघर्ष करायला लागत आहे.

Advertisement

मकर संक्रांतीचे म्हणजेच संक्रमणाचे वेध लागलेले असताना, राज्यातील महापालिकांमध्ये राजकीय संक्रमण होणार आहे. वर्षाच्या सुरूवातीला जानेवारी महिन्यात किंवा मराठी पौष महिन्यात केवळ एकच सण असतो, तो म्हणजे मकर संक्रांत. मात्र राज्यातील 29 शहरात जिथे महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, तिथे या निवडणुकीच्या निमित्ताने लोकशाहीचा वेगळा उत्सव साजरा केला जात आहे.

राज्यातील महत्त्वाची शहरे असणाऱ्या महापालिकांमध्ये या निवडणूका होत असल्याने सर्व दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे नेते राजकीय पतंगबाजी करताना दिसत आहेत, तर दुसरीकडे उमेदवारांना मात्र जमिनीवर राहुन स्थानिक पातळीवर मतदानासाठी संघर्ष करावा लागत असल्याचे चित्र दिसत आहे. 2022 नंतर महाराष्ट्रातील राजकारणात शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीनंतर पहिल्यांदा महापालिका निवडणूक होत आहे. शिवसेनेत फुट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने सगळ्या निवडणूका शिवसेना कोणाची? तसेच बाळासाहेबांचे विचार या एकाच मुद्यावर शिवसेना ठाकरे गटाच्या विरोधात निवडणूक लढवली, मात्र या निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधूच एकत्र आल्याने शिंदेंच्या या मुद्यातील हवाच निघून गेली. मुंबई महापालिकेत मराठा अस्मितेचा मुद्दा उचलत ठाकरे बंधूंनी महायुतीसमोर चांगलेच आव्हान उभे केले आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्याने मराठी मतदार हा शिवसेना आणि मनसेच्या बाजुने एकवटल्याचे दिसत आहे. तर भाजपने बिगर मराठी मतदारांना आपल्याकडे वळविले आहे.

Advertisement

काँग्रेसने या निवडणुकीत वंचित बरोबर आघाडी केली आहे, तर आरपीआय आठवले गट काही ठिकाणी स्वबळावर तर काही ठिकाणी महायुतीत लढत आहे. नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला मिळालेले यश त्यातच राज्यातील प्रादेशिक पक्षांची उध्दव ठाकरे, राज ठाकरे आणि शरद पवार यांची शिवशक्ती तर शिवसेना, मनसे किंवा राष्ट्रवादी या प्रादेशिक पक्षासोबत न जाता काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीच्यासोबत युती करत सक्षक्त तिसरा पर्याय जनतेपुढे निर्माण केला आहे.

राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीत देशाची आर्थिक राजधानी आणि आशियातील श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेच्या लढतीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. शिवसेनेत फुट पडल्यानंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणूक झाली, मात्र खरी शिवसेना कोणाची आणि मुंबईत आवाज कोणाच्या हा प्रश्न अजुनही अनुत्तरीतच आहे. महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा मुंबईत सत्ता कोणाची मुंबईत आवाज कोणाचा याची चर्चा या निवडणुकीच्या निमित्ताने होणार आहे. मुंबई महापालिका निवडणुकीचे वैशिष्ट्या म्हणजे तब्बल 66 जागांवर शिवसेना विरूध्द शिवसेना असा थेट रणसंग्राम, ठाकरेंच्या शिवसेनेतील थेट 80 टक्के नगरसेवकांना शिंदे यांनी आपल्यासोबत आणत त्यांना रिंगणात उतरवले आहे, शिंदेंचे उमेदवार हे जुन्या ओळखी आणि प्रभागातील विकासकामांच्या जोरावर जनतेला साद घालत आहेत, तर दुसरीकडे उध्दव ठाकरे यांनी त्यांच्याच कधी काळच्या माजी सहकाऱ्यांच्या (शिंदे गटातील) विरोधात आपली दुसरी फळी उभी करत, तोडीस तोड उमेदवार उभे केले आहेत. ज्यात 66 ठिकाणी शिवसेना विरूध्द शिवसेना सामना होत आहे,

विधानसभा निवडणुकीत मुंबईत ठाकरेंचे 10 आमदार मुंबईत निवडून आले. त्यातील 5 आमदार (हारूण खान, वरूण सरदेसाई, मनोज जामसुतकर, अशोक नर, महेश सावंत) हे पहिल्यांदा निवडून आले.

शिवसेनेची दोन शकले झाल्यानेच या नवख्या पाच जणांना आमदार होण्याची संधी मिळाली. त्यामुळे महापालिकेत किती नवख्या नगरसेवकांना संधी मिळणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. मराठी ही मुंबईची ओळख टिकवून ठेवण्यासाठी, मराठी अस्मितेसाठी ठाकरे बंधूंनी केलेल्या आवाहनाला मराठी मतदारांचा पाठिंबा मिळताना दिसत आहे. मुंबईच्या राजकारणात मराठी मतांसोबतच उत्तर भारतीय, गुजराती आणि मुस्लिम मतांची भूमिका निर्णायक असते, उत्तर भारतीय आणि गुजराती मतांवर भाजप आणि शिंदेंची शिवसेना आपली मदार ठेवून आहे.

विकास आणि मोदी ब्रॅन्ड या जोरावर ही मते आपल्याकडे खेचण्याचा महायुतीचा प्रयत्न आहे, तर मुस्लिम आणि दलित मतांवर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची नजर आहे. मात्र सगळ्याच मतदार संघात अपक्षांचे फुटलेले पेव, त्यातच महायुती आणि शिवशक्ती यांच्यातील स्थानिक पातळीवर नेत्यांमधील समन्वय हा देखील या निवडणुकीसाठी महत्त्वाचा असणार आहे.

नगरपालिका निवडणुकीप्रमाणे महायुतीतील भाजप आणि शिंदे शिवसेना ही नवी मुंबई, उल्हासनगर, मिरा-भाईंदर या महापालिका निवडणुकीत एकमेकांच्या समोर लढताना दिसत आहे. मंत्री प्रताप सरनाईक विरूध्द आमदार नरेंद्र मेहता, गणेश नाईक विरूध्द एकनाथ शिंदे, कुमार आयलानी विरूध्द डॉ. श्रीकांत शिंदे अशी ही नुरा कुस्ती होत आहे. विरोधकांना स्पेस न ठेवता नगरपालिका निवडणुकीप्रमाणे स्वबळावर लढताना एकमेकांची लायकी काढत निवडणूक लढवली जात आहे. मात्र निकालानंतर विकासासाठी सत्तेत यायचे हा पॅटर्न नगरपालिकांच्या निकालाने दाखवून दिला. तिकडे पुण्यात आणि पिंपरी-चिंचवडमध्ये काका-पुतणे यांनी एकत्र येत भाजपच्या विरोधात दंड थोपटले आहेत, या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने आरोप प्रत्यारोपाच्या जोरदार फैरी झडताना दिसत आहेत. भाजपचे आमदार महेश लांडगे उपमुख्यमंत्री अजित पवारांवर शेलक्या शब्दात टीका करताना दिसत आहेत, तर तिकडे ठाण्यात एकनाथ शिंदे यांचे राजकारणातील वर्चस्व वाढल्यानंतर काहीसे अडगळीत गेलेले आणि ठाण्याचे पालकमंत्री न मिळालेल्या गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांचा टांगा फरार करताना घोडे बेपत्ता करण्याची धमकी दिली आहे. आता प्रचाराला शेवटचे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत, त्यामुळे राज्यातील गेल्या काही दिवसातील स्थानिक पातळीवरील समीकरणे बघता, कोण कोणासोबत जाईल हे सांगता येत नाही. मकर संक्रांतीच्या आदल्यादिवशी केली जाणारी भोगीची भाजी जशी असते, तशीच सरमिसळ आता राजकारणात झाली आहे.

शेवटचे दोन दिवस असल्याने आरोप -प्रत्यारोपाचे आणि आश्वासनाचे पतंग उंचच उंच हवेत उडतील, मात्र कोणाचा पतंग उंच जाणार आणि कोणाचा कापला जाणार हे 16 जानेवारीलाच कळेल!

प्रवीण काळे

Advertisement
Tags :

.