नेत्यांच्या सोयीच्या कृतीने विश्वासार्हता धोक्यात
राज्यातील जनतेने दिलेल्या निकालाने चक्रावलेले राजकारणी आपापल्या पद्धतीने टिकून राहण्याच्या प्रयत्नात दिसून आहेत. त्यामुळे उलटे-सुलटे राजकारण घडण्याची परिस्थिती आहे. परिणामी त्यांच्या विषयी अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.
.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या काळात राज्यातील राजकीय नेते जी टोकाची भाषा वापरत होते ती आज आठवली तरी पुढची किमान पाच वर्षे या नेत्यांमध्ये कधी एकमत होईल अशी शक्यताही कोणी वर्तवली नसती. मात्र निकालांचा झटका इतका मोठा आहे की सत्ताधारी आणि विरोधक दोघेही अधांतरी झाले आहेत. मंत्रिमंडळ विस्तारात डावलले गेलेल्या सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर संताप व्यक्त केला. कुटुंबातील इतर सदस्य बंडखोरी केलेल्याना मंत्री केले याचा राग व्यक्त केला. त्यांच्याशी सविस्तर बोलणे झाले आहे असा खुलासा मुख्यमंत्री यांनी केला पण तोही सुधीरभाऊंनी धुडकावून लावत गडकरी यांची भेट घेतली. फडणवीस त्यानंतर मौन झाले. कदाचित ते सुधीरभाऊंच्या चुकांबद्दल पक्षात बोलतील. तसाच छगन भुजबळ यांनी अजितदादांच्या नेतृत्वावर प्रश्न निर्माण करून रोज टीकेची झोड सुरू ठेवली आहे. समता परिषदेची, पर्यायाने ओबीसीची शक्ती दाखवून देण्याचा इशारा ते देत आहेत. तर त्यांच्याच जिह्यातून त्यांना विरोधक निर्माण झाल्याने हे राज्यातील ओबीसींचे नव्हे तर नाशिक जिह्यातील माळी समाजाचे नेते आहेत असे वक्तव्य करून त्यांचे नेतृत्व खुजे करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. भुजबळ यांच्या विरोधात बोलणाऱ्या कांदे यांना त्यामुळे भाव आला आहे. भुजबळ स्वत: उभे राहिले, मुलाला विधान परिषद मिळवली आणि पुतण्याला महायुतीच्या सुहास कांदे यांच्या विरोधात अपक्ष उभे केले गेले. समीर भुजबळ यांच्या या बंडामागे भुजबळ आहेत की अजितदादांशी जवळीक असलेले समीर हे महाराष्ट्रातील आणखी एक भावी बंडखोर पुतणे आहेत ते नजीकच्या काळात लक्षात येईलच. कारण भुजबळ यांना भाजपमध्ये विसावा मिळेल अशी चर्चा आहे. त्याच शब्दावर ते बाहेर येऊ शकले असे सांगणारेही पदोपदी भेटत आहेत. अजित पवार यांनी भुजबळ आणि वळसे पाटील यांचे ओझे वाहण्याचे काहीही कारण नव्हते. दोघे थोरल्या पवारांची जबाबदारी होते. 1992 पासून भुजबळ मंत्री होते तर वळसे पाटील पुणे जिह्यात नेहमीच अजितदादांच्या आडवे येत राहिले होते. परिणामी त्यांना डच्चू मिळाला. मात्र भुजबळ यांनी त्याला आपल्या जरांगे विरोधी भूमिकेचे फळ भासवून दादांना कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला. त्यात दादांचे कथित आजारपण आडवे आले. किती काळ तुम्ही मंत्री राहणार? असा थेट प्रश्न ते अद्याप धाडसाने विचारू शकले नाहीत. राज्यातील मंत्रिमंडळात कोणीही नेता विशेषत: मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री निर्धास्तपणे आपल्या आसनावर बसू शकतील असे वातावरण आज नाही. एकनाथ शिंदे यांच्या पक्षात तर मंत्री न झालेल्यांच्या संतापाचा पारा उच्च टोकावर पोहोचला आहे. बंडखोर वृत्तीचे हे आमदार, माजी मंत्री खासगीत खूपच टोकाची भाषा वापरू लागले आहेत. विशेष म्हणजे नेतृत्वातील तिघांच्याही दोऱ्या ज्या दिल्लीच्या हातात आहेत त्यांचा खेळ तर याहून वेगळा सुरू आहे. एकतर पक्षाकडे बहुमत असल्याने ऐनवेळी राज्यात कोणाच्याही विरोधात व्हीटो पॉवर वापरण्याची त्यांना मुभा मिळाली आहे. शिवाय राज्यातील प्रमुख विरोधक दुर्बल झाल्याने त्यांच्याशी चर्चा करणे सोपे झाले आहे. परिणामी दिल्लीत राहुल गांधी आणि राज्यात सत्तेतील तिन्ही प्रमुख अवस्थ राहतील अशी गुरुकिल्ली दिल्लीच्या हातात आली आहे.
दिल्लीत शरद पवार यांच्या वाढदिवसाला केंद्रातील भाजपने जितके महत्त्व दिले ते पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी टोकाची टीका आणि शेलकी विशेषणे दिलेले शरद पवार ते हेच का? असा लोकांना प्रश्न पडला असावा. बदलत्या राजकारणात पवारांची गरज दिल्लीच्या राजकारणात खूप महत्त्वाची असल्याने भाजप त्यांना महत्त्व देत आहे, असे सांगितले जात आहे. ते केवळ हास्यास्पद म्हंटले पाहिजे. कारण, पवारांची गरज तर पूर्वीही होती मग त्यावेळी पवारांना असे महत्त्व देण्याऐवजी त्यांना अधिक अडचणीत का आणले गेले? पवार तडजोडीला तेव्हा तयार नव्हते तर आता तयार होतीलच अशी सत्तापक्षाला खात्री झाली आहे का? असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. पवार यांनीही आपण लोकांच्या कामासाठी कोणालाही भेटू शकतो असा संदेश दिला आहे. त्यांच्यासोबत डाळींबाचा वाण घेऊन गेलेल्यांच्या हातातील डाळिंबाचे चित्र हे फुललेल्या कमळाप्रमाणे असावे हा केवळ योगायोग असू शकत नाही! त्यांना काय संदेश द्यायचा आहे? आणि पुन्हा कशी वेळ मारून न्यायची आहे हे त्या भेटीच्या फोटोवरून लक्षात येतेच. पण, याचा परिणाम अजित पवार यांच्यावर काय होणार? याचा विचार करावा तर त्याआधी शरद पवार यांनीही अजितदादा आणि त्यांच्या बंडखोर नेत्यांना भेटीसाठी वेळ देऊन महाराष्ट्राला बुचकळ्यात टाकलेले आहेच. परिणामी विरोधी आघाडी देखील पवारांना निरर्थक प्रश्न विचारून सतावू शकणार नाही! या गदारोळात आणखी एक भेट लक्ष वेधून गेली. ती होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची. या दोघांनी एकमेकांवर सोडलेले वाग्बाण लोक विसरले असतील असे म्हणायला जागाही नाही. पण तशी टीका त्यांनी 2017 साली मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा केली होती. जबड्यात हात घालणारे नंतर हातात हात घालून वावरताना दिसले. फोटो अजूनही लोकांच्या डोळ्यासमोरून हटलेला नाही. त्यानंतर 2019 आणि 2021 चे राजकारण घडून गेले आहे. 2024च्या निवडणुकांचा निकाल ताजा आहे. अशा स्थितीत भक्कम झालेल्या दिल्लीला घाबरायचे की मिळून चालायचे असा काही प्रश्न फडणवीस आणि ठाकरे यांच्यासमोरही आहे. त्या दृष्टीने त्यांनी विचार केला नसेल असे म्हणता येणार नाही. ठाकरे यांनी विधिमंडळात अचानक त्यांची घेतलेली भेट ही महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला शोभणारी म्हणावी की दिल्लीत पवारांनी घेतलेल्या भेटीप्रमाणेच ही भेट सुद्धा काही विचारपूर्वक झाली म्हणावे हा प्रश्न उरतोच. एक मात्र खरे की, खूप वर्षानंतर कोणातरी दिल्लीश्वरांना महाराष्ट्रात रिंग मास्टर होण्याची संधी मिळाली आहे. आता ते कुठल्या कुठल्या सिंहांना जाळ्यातून उडी मारायला लावतात ते पाहायचे.
शिवराज काटकर