भरड येथे गुटखा विक्रीवर एलसीबीची कारवाई
५१ हजारांचा मुद्देमाल जप्त
मालवण | प्रतिनिधी
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (एलसीबी) विशेष पथकाने मालवण तालुक्यातील भरड परिसरात प्रतिबंधित गुटखा व सुगंधी तंबाखूजन्य पदार्थांच्या साठ्यावर कारवाई करत ५१ हजार २५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी संबंधितांविरोधात भारतीय न्याय संहिता तसेच अन्न सुरक्षा व मानके कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ३ जून २०२६ रोजी सायंकाळी ४.२५ वाजण्याच्या सुमारास भरड-वायरी, मालवण येथे ही कारवाई करण्यात आली. यावेळी अमित अशोक सावंत (वय ४०, रा. भरड, रांगोळी महाराज मठ परिसर, ता. मालवण) तसेच ॲलेक्स (पूर्ण नाव व पत्ता उपलब्ध नाही) यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली.छाप्यात पोलिसांनी प्रतिबंधित गुटखा व विविध सुगंधी तंबाखूजन्य पदार्थ असा एकूण ५१ हजार २५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम १२३ तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ मधील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात येत आहे.सदर कारवाई अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राणे, पोलीस हवालदार डॉमिनिक डिसोजा, डिसोजा, महिला पोलीस कॉन्स्टेबल सावंत तसेच पोलीस कॉन्स्टेबल समजिस्कर यांचा समावेश होता.जिल्ह्यात प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व इतर आरोग्यास घातक पदार्थांच्या विक्रीविरोधात पोलीस प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली असून अशा अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलीस विभागाने दिला आहे. आरोग्यास गंभीर धोका निर्माण करणाऱ्या अशा पदार्थांच्या विक्रीला आळा घालण्यासाठी नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.