फोंडाघाट दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपींच्या एलसीबीने आवळल्या मुसक्या
अवघ्या 5 दिवसांत लावला छडा
प्रतिनिधी
कणकवली
कणकवली पोलीस ठाण्यात 30 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास तृप्ती लिंग्रस यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चार अज्ञात इसमानी लिंग्रस यांच्या घरात दरोड्याच्या उद्देशाने बळजबरीने घुसले. लिंग्रस यांच्या मानेला पकडून तिला बेडवर पाडून तिच्या गळ्यातील सोनसाखळी खेचण्याचा प्रयत्न केला. त्यातील एका चोरट्याने तृप्ती हिची आई ओरडू नये म्हणून तिचे तोंड दाबले. तृप्ती हिने चोरट्याच्या हाताचा चावा घेतला. तसेच चोर चोर अशी ओरडल्यामुळे भांबावलेल्या चारही चोरांनी तिथून धूम ठोकली. पळून जाताना चोरांनी त्यांच्याकडील कटावणी कटर लोखंडी रॉड घरातच टाकले होते. तसेच एका चोराचे चप्पल सुद्धा घरातच राहिले होते. तृप्ती हिने अंगणात येऊन पाहिले असता चोरांनी पिवळी नंबर प्लेट असलेल्या एर्टीगा कारमधून फोंडाघाट चेकपोस्ट दिशेने पलायन केले होते. याबाबत तृप्ती लिंग्रस यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कणकवली पोलीस ठाण्यात बिएनएस 333, 309 (5), 3 (5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. तांत्रिक मुद्द्यांच्या आधारे व गोपनीय माहितीनुसार एलसीबीच्या पथकाने शिताफीने या रॉबरी मधील तीन आरोपींना पकडून कणकवली पोलिसांच्या ताब्यात पुढील तपासासाठी हवाली केले आहे. या तिन्ही आरोपींवर अटकेची कारवाई करून त्यांना कणकवली न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.कणकवली फोंडाघाट मधील लिंग्रस यांच्या घरात बळजबरीने घुसून रॉबरी करण्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यातील तीन आरोपींना एलसीबी सिंधुदुर्गच्या पथकाने मुंबई उपगरातून 5 डिसेंबर रोजी रात्री ताब्यात घेत कणकवली पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. गुन्ह्यात वापरलेली कार सुद्धा एलसीबीच्या पथकाने जप्त केली आहे. जगदीश श्रीराम यादव (रा. भिवंडी), चनाप्पा साईबाण्णा कांबळे (रा. वागळे इस्टेट ठाणे), नागेश हनुमंत माने (रा. नेरुळ) अशी पकडलेल्या आलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत. गुन्हा घडल्यापासून अवघ्या 5 दिवसांत पोलीस अधीक्षक डॉ. दहिकर, अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार एलसीबी पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, हवालदार आशिष गंगावणे, कॉन्स्टेबल कांडर यांनी कारवाई केली.