एलसीबीचे एपीआय रोहित फार्णे यांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान
सातारा :
सांगली जिह्यातील बहे बोरगाव गावचे सुपूत्र एपीआय रोहित फार्णे यांनी पोलीस दलात एक वेगळीच छाप सुरुवातीपासून उमटवत वाटचाल सुरु केली आहे. त्यांची सेवा गडचिरोली, पुणे, सातारा येथे झाली असून त्यांनी जेथे जेथे सेवा केली आहे. तेथे आपले वेगळेपण दाखवून दिले आहे. त्यांनी गडचिरोली येथे नक्षलवादी कारवाईत सहभागी होवून मेहिम फत्ते केल्याबद्दल त्यांचा दि. 29 जुलै रोजी मुंबईत राजभवनात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते पदक प्रदान करण्यात आले. त्यांना पदक मिळाल्याने सातारा पोलीस दलाचा सन्मान झाला आहे.
सातारा पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेत सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित फार्णे हे कार्यरत आहेत. त्यांचे गाव सांगली जिह्यातील बहे बोरगाव हे असून त्यांनी पोलीस दलात रुजू केल्यानंतर पुणे, गडचिरोली येथे सेवा केले आहे. गडचिरोलीत कार्यरत असताना तत्कालिन पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या कार्यकाळात विशेष अभियान पथक (सी 60) येथे कार्यरत असताना एपीआय रोहित फार्णे यांच्यासह पोलीस पथकाच्या तुकडीवर दि. 13 नोव्हेंबर 2021 मध्ये मोजामर्दिनटोला जंगल परिसरात 120 नक्षलवाद्यांनी हल्ला केला. अचानक झालेल्या हल्याने सुरुवातीला पोलीस पथकातील सर्वच अचंबित झाले. तब्बल दहा तास नक्षलवादी आणि पोलीस यांच्यात गोळीबार झाला. त्यामध्ये पोलिसांनी 26 नक्षलवाद्यांना यमसदनी धाडले होते. याच धाडसी कारवाईत सातारा पोलीस दलातील एपीआय रोहित फार्णे हे होते. त्यांच्या याच कामगिरीमुळे त्यांचा राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. साताऱ्यात सुद्धा स्थानिक गुन्हे शाखा अर्थात एलसीबीला त्यांनी पदभार स्वीकारल्यापासून अनेक धडाकेबाज कारवायामध्ये सहभाग नोंदवला आहे. अनेक क्लिष्ट गुन्हे उघडकीस आणण्यामध्ये त्यांचा मोलाचे योगदान आहे. त्यांना राज्यपालांच्या हस्ते सन्मान करण्यात आला आहे. त्याबद्दल सातारा पोलीस दलाचे अधीक्षक तुषार दोषी, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, डीवायएसपी अतुल सबनिस, पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्यासह सर्वच सातारा पोलीस दलाने त्यांचे अभिनंदन केले.