डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनची पायाभरणी
पुढील जयंतीदिनी उद्घाटन करण्याचा मानस - मुख्यमंत्री : कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती
पणजी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीचे औचित्य साधून आंबेडकर भवनची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याहस्ते पायाभरणी करण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली ही मागणी आता खऱ्या अर्थाने मार्गी लागली असून डॉ. आंबेडकर यांच्या पुढील जयंतीदिनी तिचे उद्घाटन करण्याचा मानस आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केले. पणजीतील डॉ. आंबेडकर पार्कमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. त्यावेळी समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, मुख्य सचिव डॉ. व्ही. कंदवेलू, आमदार प्रवीण आर्लेकर, खात्याचे संचालक दीपक बांदेकर, अनुसूचित जाती/जमाती आयुक्त रवींद्र गावकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती. पुढे बोलताना डॉ. सावंत यांनी डॉ. आंबेडकरांच्या संकल्पनेनुसार शिक्षण हे सक्षमीकरणाचे सर्वात शक्तीशाली साधन असल्याचे नमूद केले.
तसेच विविध योजनांच्या माध्यमातून मागास वर्गांच्या कल्याणासाठी सरकार वचनबद्ध असल्याचा पुनऊच्चार केला. नारी शक्ती अधिनियम आणि ‘नशामुक्त भारत नशामुक्त गोवा’ यांसारख्या मोहिमांवर प्रकाश टाकला. त्याचबरोबर गुणवंत विद्यार्थ्यांना नीट व जीसेट यासारख्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षांना बसण्यासाठी विशेष शिष्यवृत्ती देण्यात येईल, त्याचा लाभ एससी समाजातील विद्यार्थ्यांनाही मिळेल, असे आश्वासन त्यांनी दिले. आंबेडकर भवनमध्ये सभागृहासह एससी समाजातील विद्यार्थांसाठी निवास सोय उपलब्ध करून दिली जाईल. त्यामुळे राज्याच्या विविध भागातून शिक्षणासाठी पणजीत येणाऱ्या विद्यार्थ्यांची सोय होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी त्यांच्याहस्ते विविध कल्याणकारी योजनांतर्गत 1,999 लाभार्थ्यांना आर्थिक साहाय्य प्रदान करण्यात आले. तसेच शैक्षणिक कामगिरीबद्दल गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.