For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेनकनहळ्ळी गावची लक्ष्मीयात्रा 23 पासून

12:18 PM Apr 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
बेनकनहळ्ळी गावची लक्ष्मीयात्रा 23 पासून
Advertisement

यात्रा उत्साहात साजरी करण्यासाठी एकजुटीने प्रयत्न : तब्बल 33 वर्षांनंतर भरणार यात्रा

Advertisement

वार्ताहर /हिंडलगा

बेनकनहळ्ळी गावची लक्ष्मीयात्रा तब्बल 33 वर्षांनंतर आयोजित केली जात आहे. या यात्रेचा शुभारंभ मंगळवार दि. 23 एप्रिल रोजी होणार असून एकूण नऊ दिवस ही यात्रा भरणार आहे. गावातील यात्रा कमिटी, देवस्की पंच व ज्येष्ठ नागरिक यांना संघटित करून ही यात्रा यशस्वी करण्यासाठी गेले चार महिने सातत्याने बैठका घेऊन प्रयत्न केले जात आहेत. बेनकनहळ्ळी कार्यक्षेत्रात गणेशपूर, ज्योती नगर, सरस्वती नगर, चोपडे लेआउट या भागांचा समावेश आहे. या यात्रा कमिटीत सर्व भागातील जाणकार व्यक्तींना व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन या यात्रेचे स्वरूप आखले आहे. यासाठी गावातील सर्व रस्ते जवळजवळ काँक्रिटीकरण झाले असून काही भागात पेव्हर बसवण्यात आले आहेत. एकंदरीत 85टक्के काम पूर्ण झाले असून यामध्ये गटारी, पाण्याची सोय, विद्युत सोय करण्यात आली आहे. रथाला अडथळा होऊ नये यासाठी एका बाजूने विद्युत सोय करण्यात आली आहे. तसेच कांही झाडांच्या फांद्यादेखील तोडण्यात आल्या आहेत. यामुळे रथ फिरायला कोणतीही अडचण येणार नाही.

Advertisement

मंडप उभारणी राजवाडा स्वरूपात

बेनकनहळ्ळी गावातील लक्ष्मी मंदिर, मारुती मंदिर, ब्रम्हलिंग, विठ्ठल रखुमाई मंदिर अशा सर्व मंदिरांना रंगरंगोटी केली आहे. याशिवाय पार्किंगची सोय गावच्या सभोवती मोकळ्या जागेत करण्यासाठी ठराविक जागा राखीव ठेवल्या आहेत. रथ फिरण्यासाठी कोणतीही अडचण भासू नये यासाठी सर्वप्रकारची तयारी झाली आहे. लक्ष्मी गदगेला बसण्याच्या ठिकाणी मोठ्या मंडपाची उभारणी केली जात आहे. मंडपाची उभारणी राजवाड्याच्या स्वरूपात असून ही जागा सरकारी प्राथमिक मराठी शाळा बेनकनहळ्ळी याला लागून आहे. या गावाला बेळगाव-बेळगुंदी हा एकमेव मार्ग असला तरी सध्या सावगाव-बेनकनहळ्ळी, सुळगा-बेनकनहळ्ळी तसेच हिंडलगा-गणेशपूर अशा पद्धतीने रस्ते जोडले गेल्यामुळे भाविकांना या भागात येण्यास कोणतीही अडचण भासणार नाही, अशी योजना केली गेली आहे.

हेस्कॉमकडून ट्रान्स्फॉर्मरची सोय

गावातील सर्वप्रकारच्या सुधारणा करण्यासाठी ग्रामीण भागाच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आपला बराचसा फंड या भागासाठी मंजूर करून विविध कामांची पूर्तता करून दिली आहे. गावातील प्रत्येक कुटुंबाने आपल्या घरांना रंगरंगोटी करून काहींनी आपले स्वतंत्र नवीन बंगले बांधले आहेत. याशिवाय येणाऱ्या पाहुणेमंडळींसाठी भोजन व्यवस्था म्हणून बऱ्याच कुटुंबांनी आपल्या घराच्या बाजूला मंडपाची उभारणी केली आहे. गावातील महिला वर्गदेखील मोठ्या जोमाने कामाला लागल्या असून विशेष करून खरेदी व्यवहार पूर्ण झालेले आहेत. खास करून विजेच्या सोयीबाबत हेस्कॉमने दोन नवीन ट्रान्स्फॉर्मर बसविले आहेत. एक 100 किलो वॅट व 63 किलो वॅटचे दोन ट्रान्स्फॉर्मर्स बसवण्यात आले आहेत. यासाठी हेस्कॉमचे एम. के. पाटील व मल्लेश मिटवटकर हे कार्य करत आहेत. गावात उत्साहाचे वातावरण पसरले असून रथाचे काम पूर्ण झाले आहे.

Advertisement
Tags :

.