लक्ष्मणराव होनगेकर यांचा उचगावमध्ये विजयोत्सव
वार्ताहर/ उचगाव
बेळगावच्या बसवाण गल्लीतील मराठा को-ऑप. बँकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीत सहाव्यांदा विजयी होऊन विश्वासास पात्र ठरलेले लक्ष्मणराव होनगेकर यांचा उचगावमध्ये दिमाखात विजयोत्सव साजरा करण्यात आला.
उचगावचे सुपुत्र लक्ष्मणराव होनगेकर हे बेळगावातील मराठा बँकेमध्ये 1990 पासून संचालक म्हणून कार्यरत आहेत. बँकेच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांनी समर्थपणे सांभाळले आहे. बँकेत त्यांनी 30 वर्षांच्या काळात अनेक योजना राबविल्या आहेत.
लक्ष्मण होनगेकर हे ता.पं.चे माजी अध्यक्ष, उचगाव साहित्य अकादमीचे 25 वर्षे अध्यक्ष आहेत. तालुक्यात मराठी भाषा टिकली पाहिजे, वाढली पाहिजे यासाठी साहित्य संमेलन भरवतात. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक कार्यात त्यांचा पुढाकार असतो. गावातील मंदिरे त्यांच्या सहकार्यातून उभी राहिली आहेत. बेळगाव मार्केट यार्डमध्ये प्रसिद्ध अडत व्यापारी म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. समाजसेवेत ते सदोदित कार्यरत आहेत. त्यांच्या या कार्याची पोचपावती म्हणून त्यांना बँकेच्या सभासदांनी मतदान करून पुन्हा भरघोस मतांनी निवडून दिले आहे. त्यांचा विजयोत्सव उचगाव ग्रामस्थांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करून तसेच मिठाई वाटून साजरा केला.