For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बुडाच्या अध्यक्षपदी लक्ष्मणराव चिंगळे

10:09 AM Mar 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
बुडाच्या अध्यक्षपदी लक्ष्मणराव चिंगळे
Advertisement

राज्य सरकारचा आदेश : आज स्वीकारणार पदभार : कार्यकर्त्यांकडून जल्लोष

Advertisement

निपाणी : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी राजकीय तसेच प्रशासकीय पातळीवर वेगवेगळ्या हालचाली होताना दिसत आहेत. राज्यात काँग्रेस सरकार सत्तेत आल्यानंतरही गेल्या वर्षभरापासून रखडलेल्या शासननियुक्त पदांवर नियुक्त्या केल्या जात आहेत. त्यानुसार बेळगाव नगर विकास प्राधिकरण अर्थात बुडा या संस्थेच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांची निवड झाली आहे. तसा आदेश राज्य सरकारच्या नगरविकास खात्यांतर्गत नगर योजना प्राधिकरणच्या प्रधान सचिव लता के. यांनी काढला आहे. शुक्रवारी रात्री या निवडीची अधिकृत घोषणा होताच निपाणीत चिंगळे यांच्या समर्थक व कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. बेळगाव शहरातील महानगरपालिकेपाठोपाठ बुडा ही अत्यंत महत्त्वाची संस्था आहे. नगर विकास प्राधिकरण हे कर्नाटक नगर आणि देश नियोजन अधिनियम, 1961 अंतर्गत नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त केले गेले आहे. या पदावर चिंगळे यांची नियुक्ती करून निष्ठावंत नेत्याचा सन्मान करण्यात आल्याची भावना व्यक्त होत आहे. चिंगळे हे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, तसेच पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. यापूर्वी त्यांनी राज्य सरकारच्या खादी ग्रामोद्योग महामंडळाचे अध्यक्षपद,  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक पद, राज्य सहकारी बँक अर्थात अॅपेक्स बँकेचे संचालक आदी महत्त्वाची पदे भूषवली आहेत.

चिकोडी लोकसभेसाठी प्रियांका जारकीहोळी यांच्या नावावर शिक्कामोर्तब?

Advertisement

आगामी चिकोडी लोकसभा निवडणुकीसाठी चिंगळे यांचे प्रमुख दावेदारांमध्ये नाव आहे. अशावेळी अचानक बुडा अध्यक्षपदी त्यांची झालेली नेमणूक म्हणजे चिकोडी लोकसभेसाठी प्रियांका जारकीहोळी यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे समजते. चिंगळे यांनीही केवळ जारकीहोळी यांच्यासाठी एक पाऊल मागे घेण्याची तयारी दाखवली होती. एकंदरीत काँग्रेस नेत्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या पक्षनिष्ठेचा सन्मान केल्याच्या भावना व्यक्त होत आहेत.

Advertisement
Tags :

.