For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सरंबळच्या लक्ष्मण कदम यांना व्यवस्थापन शास्त्रात पीएचडी

05:03 PM Apr 24, 2026 IST | अनुजा कुडतरकर
सरंबळच्या लक्ष्मण कदम यांना व्यवस्थापन शास्त्रात पीएचडी
Advertisement

कुडाळ: प्रतिनिधी

Advertisement

तालुक्यातील सरंबळ गावचे सुपुत्र लक्ष्मण कदम यांना मुंबई विद्यापीठाकडून व्यवस्थापन शास्त्र (Management Studies) या विषयात डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी (पीएचडी) पदवी प्रदान करण्यात आली आहे. लक्ष्मण कदम यांनी आपले शालेय शिक्षण सरंबळ हायस्कूलमधून पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथून एम.एस्सी. (कृषी)पदवी संपादन केली. तसेच पुढे त्यांनी आयआयटी मुंबई येथून एक्झिक्युटिव्ह एमबीए पूर्ण केले.लहानपणापासूनच शेतीशी जवळीक असल्याने कृषी क्षेत्रातील समस्यांचे समाधान करण्यासाठी कार्य करण्याचा त्यांनी निर्धार केला. त्यांच्या पीएचडी संशोधनाचा विषय “महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कृषी रसायनांबाबत खरेदी वर्तनाचा अभ्यास” हा असून, हा अभ्यास व्यवस्थापन शास्त्राच्या दृष्टिकोनातून करण्यात आला आहे. यामुळे कृषी रसायनांबाबत बाजारपेठेतील वास्तव व उपयुक्त माहिती समोर आली आहे.सध्या ते मुंबईतील एका नामांकित कृषिरसायन उत्पादक कंपनी मध्ये ग्लोबल मार्केटसाठी प्रॉडक्ट रजिस्ट्रेशन विभागात कार्यरत आहेत. त्यांच्या कामकाजात ते जागतिक स्तरावर विविध देशांमध्ये निर्यात होणाऱ्या कृषी रसायनांच्या तांत्रिक नोंदणीची जबाबदारी सांभाळतात. कदम यांची ही उपलब्धी त्यांच्या शैक्षणिक व व्यावसायिक प्रवासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा असून, कृषी क्षेत्राशी असलेले त्यांचे नाते अधिक दृढ करणारी आहे. शेतकऱ्यांप्रती असलेली त्यांची जिव्हाळ्याची भावना लक्षात घेता, आपल्या ज्ञानाचा उपयोग करून गाव व शेतकऱ्यांसाठी कार्य करण्याचा त्यांचा मानस आहे.पदवी प्राप्त झाल्यानंतर लक्ष्मण कदम यांनी आपल्या यशाचे श्रेय मार्गदर्शक, मित्रपरिवार व कुटुंबीयांच्या सततच्या पाठिंबा व प्रोत्साहनाला दिले. भविष्यातही व्यवस्थापन शास्त्र व कृषी क्षेत्रात संशोधन आणि समाजोपयोगी कार्य अधिक जोमाने सुरू ठेवण्याचा त्यांचा निर्धार आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.