वकिलांकडून उपनोंदणी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना ताकीद
बेळगाव : उपनोंदणी कार्यालयामध्ये सर्वसामान्य जनतेची वेळेत कामे केली जात नाहीत. वकिलांनाही कामासाठी अनेक वेळा या कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत आहेत. एजंटांची मात्र तातडीने कामे केली जात आहेत, असा आरोप करत वकिलांनी या कार्यालयावर मोर्चा काढून त्यांना सक्त ताकीद दिली आहे. विवाह नोंदणीसाठी वकिलांनी अर्ज केले असता दोन दिवसांनंतर या, असे त्यांना सांगितले जात आहे. मात्र, या ठिकाणी एजंटांनी अर्ज केला तर तातडीने ते काम पूर्ण केले जात आहे. याचबरोबर सर्वसामान्य जनतेचीही कामे करण्यास टाळाटाळ केली जात आहे, असा आरोप वकिलांनी केला. दक्षिण उपनोंदणी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आवारात आल्यानंतर वकिलांनी संबंधित अधिकाऱ्यांना घेराव घालून सूचना केली आहे. यावेळी बेळगाव बार असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी अॅड. वाय. के. दिवटे, सदस्य अॅड. विनय नांगनुरी, अॅड. इरण्णा पुजेरी, अॅड. श्रीधर मुतगेकर, अॅड. विशाल पाटील, अॅड. सुनील सानिकोप, अॅड. चन्नबसाप्पा बागेवाडी, अॅड. अमोघ मिसाळे, अॅड. एम. जी. बिसगुप्पीसह इतर वकील उपस्थित होते.