शेतकऱ्यांच्या आंदोलनाला वकिलांचा पाठिंबा
राज्यभरात ऊस दरासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन : प्रतिटन 3500 रुपये देण्याची मागणी
बेळगाव : ऊस दरासाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी शेतकऱ्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे. प्रतिटन 3500 रुपये दर देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. यासाठी सर्वत्र रास्तारोको आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान बेळगाव बार असोसिएशनकडून शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला. मंगळवारी सकाळी राणी चन्नम्मा सर्कलमध्ये मानवी साखळी करून वकिलांनी ऊस दरासाठी आंदोलन छेडले. यानंतर प्रतिटन 3500 रुपये ऊसदर देण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. महाराष्ट्रातील कारखानदारांनी उसाला प्रतिटन 3500 हून अधिक दर जाहीर केला आहे. मात्र अद्याप कर्नाटकातील कारखानदारांनी दर जाहीर न करताच ऊस गाळप सुरू केले आहे. राज्यातील कारखानदारांकडून ऊसदर जाहीर करण्याला विलंब होतो. तसेच कमी ऊसदरामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.
यामुळे राज्यातील कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी 3500 रुपये प्रतिटन देऊन शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढावे. महाराष्ट्रातील कारखानदारांना हा दर द्यायला परवडतो तर मग कर्नाटकातील कारखानदारांना का परवत नाही? असा प्रश्न वकिलांकडून यावेळी उपस्थित करण्यात आला. शेतकऱ्यांच्या भांडवलावरच सदर कारखाने उभे केले जातात. मात्र शेतकऱ्यांच्या हिताचा विचार सदर कारखाने केव्हा करणार? असाही प्रश्न उपस्थित उपस्थित करण्यात आला. शेतकऱ्यांमुळेच आपल्याला अन्न मिळते. या अन्नाला जागून महाराष्ट्राच्या धर्तीवर कर्नाटकातील कारखानदारांनीही प्रतिटनाला 3500 हजार रुपये दर देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी अॅड. बसवराज मुगळी, अॅड. शीतल रामशेट्टी, अॅड. विजयकुमार पाटील, अॅड. यल्लाप्पा दिवटे, अॅड. विश्वनाथ सुल्तानपुरी, अॅड. सुमितकुमार अगसगी, अॅड. इरण्णा पुजेर, अॅड. विनायक निंगनुरे, अॅड. सुरेश नागनुरी, अॅड. अनिल पाटील, अॅड. अश्विनी हवालदार यांच्यासह वकील व शेतकरी उपस्थित होते.