बेळगावात वकिलांकडून निदर्शने
‘त्या’ तिघा जणांवर कारवाई करण्याची मागणी : बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांकडून आंदोलन
बेळगाव : वकिली करण्यासाठी आवश्यक पदवी व सनद नसताना बेळगावात वकिली करणाऱ्या तिघा जणांविरुद्ध कारवाई करण्यासाठी बेळगाव बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी आंदोलन छेडले. संबंधित तिघा जणांविरुद्ध कारवाई करण्याची मागणीही वकिलांनी केली आहे. अॅड. बसवराज जरळी यांनी सोनिया धारा, प्रतिभा कदम, झैद निजामी या तिघा जणांविरुद्ध पोलिसात तक्रार केली होती. सोनिया यांनी एलएलबी पूर्ण केली नाही. तरीही वकिली करीत आहेत. तर प्रतिभा यांनी एलएलबीचे शिक्षण पूर्ण केले असले तरी एआयबीई बार परीक्षा पूर्ण केली नाही. तर झैद निजामी यांनी एलएलबीचे शिक्षण पूर्ण केले नाही. महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशनकडून त्यांनी सनद मिळविली आहे.
वकिली करण्यासाठी आवश्यक पदवी नसताना वकील व्यवसाय करणाऱ्या या तिघा जणांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी वकिलांनी केली. गुन्हे तपास व वाहतूक विभागाचे एसीपी निरंजन राजे अरस यांच्याकडे कारवाईची मागणी करण्यात आली. यासंबंधी तक्रार करणाऱ्या बसवराज जरळी या वकिलांवर मार्केट पोलीस स्थानकात खोटी फिर्याद दाखल केल्याचा आरोपही वकिलांनी केला आहे. दरम्यान, यासंबंधी पत्रकारांशी बोलताना सोनिया धारा यांनी आपल्यावरील आरोप फेटाळले असून आपल्याकडे वकिली करण्यासाठी आवश्यक प्रमाणपत्रे आहेत. केवळ आपण बाहेरून आलो आहोत म्हणून आपल्याला त्रास देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.