For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बदामी येथील ‘त्या’ घटनेच्या विरोधात वकिलांचा बायकॉट

10:15 AM Jul 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
बदामी येथील ‘त्या’ घटनेच्या विरोधात वकिलांचा बायकॉट
Advertisement

कामकाज बंद करून मुख्य जिल्हासत्र न्यायाधीशांना दिले निवेदन

Advertisement

बेळगाव : न्यायालयात पक्षकाराची बाजू मांडून वकील आपले काम करत असतो. मात्र पक्षकारच न्यायालयात हजर झाला नाही म्हणून चक्क वकिलानाच पोलिसांनी ताब्यात घेण्याचा मौखिक आदेश बदामी येथील मुख्य दिवाणी न्यायालय आणि जेएमएफसी न्यायालयाने दिला. त्यानंतर दीड तास वकिलांना पोलीस कस्टडीत घेण्यात आले. हा प्रकार म्हणजे कायद्याचा गैरवापर करणे, तसेच एक प्रकारे  वकिलाचा अवमान करणारा असून त्याविरोधात बेळगाव बार असोसिएशनने कामकाजावर बहिष्कार टाकून मुख्य जिल्हासत्र न्यायालयाचे न्यायाधीश त्यागराज यांना निवेदन दिले. बदामी येथील ॲड. पंचय्या मल्लापूर यांनी आपल्या पक्षकाराची बाजू कौटुंबिक न्यायालयात मांडली. पक्षकाराने पोटगी म्हणून काही रक्कम भरायची होती. त्यासाठी पुढील तारखेपर्यंतची मुदत घेतली. मात्र पुढील तारखेला पक्षकार हजर झाला नाही. त्यामुळे बदामी येथील मुख्य दिवाणी आणि जेएमएफसी न्यायालयाचे न्यायाधीश संजीवकुमार पाच्छापुरी यांनी पक्षकार आला नाही म्हणून तुम्हालाच का अटक करू नये, असे म्हणत वकील पंचय्या मल्लापूर यांना पोलिसांना ताब्यात घेण्याचे आदेश दिले.

पोलिसांनी तब्बल दीड तास त्यांना कस्टडीत घेतले. हा कायद्याचा दुरुपयोग न्यायाधीशांनी केल्याचा ठपका ठेवून वकिलांनी मंगळवारी कामबंद आंदोलन केले. सर्व न्यायालयातील कामकाज बंद केले. त्यानंतर बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. एस. एस. किवडसण्णावर यांच्या नेतृत्वाखाली मुख्य जिल्हासत्र न्यायालयाचे न्यायाधीश त्यागराज यांना निवेदन दिले. यावेळी बेळगाव बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड. विजय पाटील, उपाध्यक्ष ॲड. शीतल रामशेट्टी, जनरल सेक्रेटरी ॲड. वाय. के. दिवटे, जॉईंट सेक्रेटरी ॲड. विश्वनाथ सुलतानपुरी, सदस्य ॲड. इरण्णा पुजेर, ॲड. सुमीतकुमार अगसगी, महिला प्रतिनिधी अश्विनी हवालदार यांच्यासह ज्येष्ठ वकील ॲड. आण्णासाहेब घोरपडे, ॲड. तिमण्णा सनदी, ॲड. गजानन जाधव, ॲड. शरद देसाई, ॲड. मारुती कामाण्णाचे, ॲड. सचिन शिवण्णावर यांच्यासह इतर वकील उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.