अकरा स्थानिक स्वराज्य संस्थांवर खटले
मंत्री ईश्वर खंड्रे : सांडपाण्यामुळे नद्या प्रदूषित झाल्याने कारवाई
बेळगाव : नदीपात्रावरील नगरपालिका व नगरपरिषदांच्या कार्यक्षेत्रातील सांडपाणी राज्यातील बारा नद्यांमध्ये मिसळत आहे. ही गोष्ट लक्षात आल्याने 11 स्थानिक स्वराज्य संस्थांवर खटले दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती वनमंत्री ईश्वर खंड्रे यांनी विधानसभेत दिली. प्रश्नोत्तराच्या तासात आमदार दर्शन पुट्टणय्या यांच्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना ईश्वर खंड्रे यांनी, केवळ सांडपाणीच नव्हे; तर काही कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या रसायनमिश्रीत पाण्यामुळेही नद्या दूषित होत आहेत. बारा नद्यांमध्ये हे पाणी मिसळत आहे, असे सांगितले.
अर्कावती, लक्ष्मणतीर्थ, तुंगभद्रा, भद्रा, तुंगा, कावेरी, कबिनी, कागीना, कृष्णा, सिंशा, भीमा, नेत्रावती नदीपात्रावरील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रातील खेडी व शहरातील सांडपाणी नद्यांमध्ये मिसळत आहे. त्यामुळे नद्या दूषित होत आहेत. कारखान्यातून बाहेर पडणारे दूषित पाणी प्रक्रिया करून नद्यांमध्ये सोडण्याची जबाबदारी त्या त्या कारखान्यांची आहे, असे वनमंत्र्यांनी सांगितले. 12 नद्यांच्या काठावर 30 स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. यामध्ये 814 एमएलडी दूषित पाणी बाहेर पडत आहे. केवळ 614 एमएलडी शुद्धीकरणासाठी प्रकल्प उपलब्ध आहे. 203 एमएलडी शुद्धीकरणासाठी व्यवस्था नाही. त्यामुळेच जलस्रोतांची तपासणी करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.