बायपासविरोधात पुन्हा न्यायालयात दावा दाखल
झिरो पॉईंट निश्चित करण्यासह हलगा-मच्छे बायपासविरोधात शेतकऱ्यांची न्यायालयीन लढाई तीव्र
बेळगाव : झिरो पॉईंट निश्चित करण्यासह हलगा-मच्छे बायपासविरोधात अखेर शेतकऱ्यांनी वरिष्ठ दिवाणी न्यायालयात सोमवार दि. 16 रोजी दावा दाखल केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बायपास विरोधातील न्यायालयीन लढाई तीव्र होणार असून या दाव्याच्या पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. बायपासच्या मुख्य दाव्याचा खटला न्यायालयात सुरू असून खटल्याचा निकाल लागेपर्यंत रस्त्याचा वापर करण्यात येऊ नये, असा अर्ज शेतकऱ्यांनी सातवे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केला होता. तसेच त्या ठिकाणी उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाने दिलेल्या आदेशाची प्रत, तसेच काही महत्त्वाची कागदपत्रे न्यायालयासमोर सादर करण्यात आली होती. पण, उच्च न्यायालयाचा आदेश आणि कागदपत्रे पाहण्याआधीच न्यायालयाने शेतकऱ्यांचा अर्ज फेटाळून लावला. पण, मूळ दाव्याचा निकाल येईपर्यंत झिरो पॉईंट निश्चित करता येणार नाही. तसेच झिरो पॉईंट निश्चित करण्याचा अधिकार न्यायालयाला असल्याचे नमूद केल्याने शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा न्यायालयीन लढा लढण्याचा निश्चय केला आहे. या निकालानंतर 30 दिवसांच्या आत वरिष्ठ दिवाणी न्यायालयात दावा दाखल करण्याची मुभा देण्यात आली होती. मात्र, शेतकऱ्यांनी निकालानंतरच्या बाराव्या दिवशीच म्हणजे सोमवार दि. 16 रोजी वरिष्ठ दिवाणी न्यायालयात धाव घेत दावा दाखल केला आहे. एकंदरीत न्यायालयीन लढाई पुन्हा एकदा तीव्र होणार असून या दाव्याच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
शेतकऱ्यांची कागदपत्रे पाहण्याआधीच निर्णय
बायपासच्या मूळ खटल्याचा निकाल लागेपर्यंत रस्त्याचा वापर करण्यात येऊ नये, असा अर्ज न्यायालयात दाखल केला होता. मात्र, तो अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. अर्ज फेटाळताना उच्च न्यायालयाचा आदेश आणि शेतकऱ्यांनी दाखल केलेली कागदपत्रे पाहण्याआधी हा निर्णय देण्यात आला आहे. त्यामुळे सोमवारी पुन्हा वरिष्ठ दिवाणी न्यायालयात दावा दाखल करण्यात आला आहे.
-अॅड. रविकुमार गोकाककर