For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मंद्रूप ठाण्याच्या हद्दीत कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवणार : गणेश शिंदे

12:13 PM Sep 16, 2026 IST | Tarun Bharat Portal
मंद्रूप ठाण्याच्या हद्दीत कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवणार   गणेश शिंदे
Advertisement

मंद्रूप : मंद्रूप पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध व्यवसायांवर नियंत्रण ठेवतानाच परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रभावीपणे काम करण्यात येईल, अशी ग्वाही नूतन उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश शिंदे यांनी दिली.

Advertisement

मंद्रूपचे तत्कालीन पोलीस निरीक्षक शंकर पटवारी यांची सोलापूर पोलीस मुख्यालयात बदली झाल्यानंतर गणेश शिंदे यांनी पदभार स्वीकारला. त्यांच्या पदभारानिमित्त दक्षिण सोलापूर पत्रकार संघटनेच्या वतीने वार्तालापाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संघटनेचे अध्यक्ष पंचाक्षरी स्वामी आणि पत्रकार अमोगसिद्ध लांडगे यांच्या हस्ते शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी शिंदे यांनी सांगितले की, यापूर्वी गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात काम करण्याचा अनुभव आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दुसऱ्यांदा उत्तीर्ण झाल्यानंतर सोलापूर उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. या काळात अवैध व्यवसाय तसेच डान्सबारविरोधात कारवाई करण्यात आली आहे. आता मंद्रूप पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व गावांमध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष लक्ष दिले जाईल.

Advertisement

मंद्रूप परिसरात कोणत्याही प्रकारचे अवैध व्यवसाय सुरू राहू दिले जाणार नसून, अशा व्यवसायांमध्ये सहभागी असणाऱ्यांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणणारे आणि महिला व मुलींची छेडछाड करणाऱ्या रोडरोमिओंवरही कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत मोटारी, केबल, दुचाकी-चारचाकी वाहने तसेच मोबाइल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. गोरगरीब नागरिक, शेतकरी, महिला आणि सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध राहील. सर्व घटकांना सोबत घेऊन कायदेशीर आणि पारदर्शक पद्धतीने काम करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

यावेळी पत्रकार गिरमल्ल गुरव, प्रभू पुजारी, अशोक सोनकंटले, शिवराज मुगळे, आरिफ शेख, महेश पवार, अभिजीत जवळकोटे, प्रमोद जवळकोटे, राहुल उड्डाणशिव, आनंद बिराजदार आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन पत्रकार नितीन वारे यांनी केले, तर आभार बबलू शेख यांनी मानले.

Advertisement

.