ऐन अधिवेशनाच्या तोंडावरच कायदा-सुव्यवस्था रामभरोसे
बेळगाव पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह : महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
बेळगाव : कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन बेळगावात होणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सर्व तयारी करण्यात येत आहे. अधिवेशनाला केवळ दहा दिवस शिल्लक असताना बेळगावात कायदा व सुव्यवस्था परिस्थिती ढासळली आहे. त्यामुळे बेळगाव पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे. गेल्या एक-दोन महिन्यातील घटना लक्षात घेता खून, खुनी हल्ले, गोळीबार आदी घटना घडल्या आहेत. इतकेच नव्हे तर वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून उद्यमबाग पोलीस स्थानकातील एका पोलिसानेही आत्महत्येची धमकी दिली होती. चोऱ्या, घरफोड्या तर सुरूच आहेत. या सर्व घटना लक्षात घेता बेळगावात कायदा व सुव्यवस्था परिस्थिती हाताबाहेर चालल्याचे स्पष्ट होते. पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांनी आपल्या अखत्यारित काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना सदैव तत्पर राहण्याची सूचना देत बारीकसारीक घटनांवरही लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. सध्या बेळगावात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांपैकी काही पोलीस अधिकाऱ्यांना तर कामच नको आहे, अशी स्थिती आहे.
केवळ वरकमाईसाठी अनेक अधिकारी बेळगावात तळ ठोकून बसले आहेत. मटका, जुगार, बेकायदा दारू व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावला आहे. अधिवेशन तोंडावर आल्यामुळे दोन दिवसांपूर्वी काही मटका अड्ड्यांवर छापे टाकून कारवाई केल्याचे भासवण्यात येत आहे. अनेक अधिकारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल करताना दिसत आहेत. रामनगर-वड्डरवाडी येथील महिलेवर झालेला हल्ला, शनिवार खूट परिसरात परिचारिकेवर कोयत्याने हल्ल्याचा प्रयत्न आदी घटनांमुळे महिला सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर तयारीची पाहणी करण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी बेळगावला येत आहेत. या अधिकाऱ्यांकडून कामचुकार पोलीस अधिकाऱ्यांचे कान पिळले जाणार काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पोलीस आयुक्तांची दिशाभूल
केवळ वरकमाईला चटावलेल्या काही अधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांची दिशाभूल सुरू केली आहे का? असा संशय बळावला आहे. आयुक्तांपर्यंत इतर कोणी पोहोचू नये, याची व्यवस्था या महाभागांनी केली असून अशा अप्पलपोटी अधिकाऱ्यांपासून पोलीस आयुक्तांनी वेळीच सावध होण्याची गरज आहे. नहून बेळगाव येथील परिस्थिती आणखी हाताबाहेर जाण्याचा धोका आहे.