Sangli : सांगलीत कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर; दलित नेते हत्येनंतर शहरात संताप
अल्पवयीन मुलांमध्ये वाढती गुन्हेगारी; सांगली कर चिंतेत
सांगली : दलित नेते उत्तम मोहिते यांच्या घरात घुसून झालेल्या हत्येनंतर सांगलीतील कायदा-सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शहरासह जिल्ह्यात नशाखोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून, अल्पवयीन मुलांमधील गुन्हेगारीही चिंताजनक पातळीवर पोहोचली आहे.
सहज उपलब्ध होणाऱ्या नशेच्या गोळ्या, गांजा, तसेच कोयता-गुप्ती सारखी हत्यारे यामुळे जिल्ह्यात गुन्हेगारी बळावली आहे. महिला आणि मुलींच्या सुरक्षेवरील प्रश्न अधिक गंभीर बनला असून, अवैध धंदे खुलेपणाने सुरू असल्याचा आरोप सामाजिक संघटना सातत्याने करत आहेत.
या सर्व पार्श्वभूमीवर आज सांगली शहराच्या मध्यवर्ती स्टेशन चौकात सर्व सामाजिक संघटनांच्या वतीने ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले. पोलिसांनी गुन्हेगारीवर तातडीने आळा घालावा, कडक पोलिसिंग करावे, अशी ठाम मागणी करत आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. अन्यथा “सर्वसामान्य नागरिकांना आत्मसंरक्षणासाठी हत्यारे बाळगण्याचा परवाना द्यावा”, अशी कठोर मागणीही यावेळी करण्यात आली.