युरोप संघाकडे लेव्हर चषक
वृत्तसंस्था / बर्लिन
स्पेनच्या कार्लोस अल्कारेझने टेलर फ्रिट्जला पराभूत केल्याने येथे झालेल्या लेव्हर चषक सांघिक टेनिस स्पर्धेचे अजिंक्यपद युरोप संघाने पटकाविले. या स्पर्धेच्या अंतिम लढतीत युरोप संघाने विश्व संघाचा 13-11 अशा गुणांनी पराभव केला.
या लढतीत युरोप संघातील अल्कारेझने फ्रिट्जचा 6-2, 7-5 अशा सरळ सेटस्मध्ये पराभव केला. युरोप संघाचे नेतृत्व स्वीडनचा माजी टेनिसपटू बिजॉर्न बोर्गकडे सोपविण्यात आले होते. या स्पर्धेत विश्व संघाला सलग तिसऱ्यांदा लेव्हर चषक जिंकण्याची संधी उपलब्ध झाली होती. विश्व संघाने युरोप संघावर 8-4 अशी आघाडी शनिवारी मिळविली होती.
रविवारी युरोप संघातील अल्कारेझने आणि कास्पर रुड यांनी दुहेरीचा सामना जिंकताना विश्व संघातील अमेरिकन जोडी शेल्टन व टिफोई यांचा 6-2, 7-6 (8-6) असा पराभव केला. त्यानंतर एकेरीच्या सामन्यात विश्व संघातील शेल्टनने युरोप संघातील मेदव्हेदेववर 6-7 (6-8), 7-5, 10-7 असा विजय मिळविल्याने विश्व संघाने पोल पोझीशन पटकाविले. त्यानंतर एकेरीच्या सामन्यात युरोप संघातील व्हेरेव्हने टिफोईचा 6-7 (5-7), 7-5, 10-5 असा पराभव केला. या निर्णायक सामन्यातील विजयामुळे युरोप संघाने 13 गुण नोंदवित लेव्हर चषकावर आपले नाव कोरले.