गाव तसं चांगलं पण बावडेकरांनी खरंच कूस बदलली?
सुसंस्कृत म्हणवणाऱ्या आणि गावपण जपणाऱ्या कसबा बावड्याला नेमकं वेठीस धरतयं तरी कोण हा खरा सवाल आहे.
By : संतोष पाटील
कोल्हापूर : जगाला पुरोगामित्व आणि समतेची शिकवण देणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांची कसबा बावडा जन्मभूमी आहे. डी. वाय. पाटील शिक्षण संकुलाच्या माध्यमातून जागतिक दर्जाचे शैक्षणिक संकुल गावात आहेत. जगातील पहिला कोल्हापूर पद्धतीचा बंधाराही इथलाच. टोकाच्या ईर्ष्येचं राजकारण असले तरी गावात एकच सोसायटी. तीही आशिया खंडात अग्रेसर. भरपूर बागायती शेती, खेटून साखर कारखाना. त्यामुळे महापालिका हद्दीत असूनही गावपण जपलेलं समृद्ध गाव म्हणजे कसबा बावडा. पण मागील काही वर्षात जत्रेच्या निमित्ताने अश्लिल नृत्यावर नाचणाऱ्या नृत्यांगणांच्या कार्यक्रमाला मनोरंजनाचा दर्जा देण्यापर्यंत मजल जावू लागली. सुसंस्कृत म्हणवणाऱ्या गावाला नेमकं वेठीस धरतयं तरी कोण हा खरा सवाल आहे.
कसबा बावड्यात राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म झाला. पद्मश्री डी. वाय. पाटील यांनी येथेच लावलेल्या शिक्षणाच्या रोपट्याचा अख्ख्या महाराष्ट्रात वटवृक्ष झाला. पंचगंगा नदीवर जगातील पहिला कोल्हापूर पध्दतीचा बंधारा येथेच आहे. गावाला पंचगंगा नदीचा वेढा असल्याने सुपीक जमिनीतून सोनं पिकतयं. लागूनच एमआयडीसी असल्याने अनेकांचे कारखाने इथे आहेत. एका बाजूला जिह्यातील सर्व शासकीय कार्यालय तर दुसऱ्या बाजूला छत्रपती राजाराम साखर कारखाना. यावरुन गावाचे भौगालिक महत्व लक्षात येते. अस्सल कोल्हापुरी बाणा जपलेलं गाव महापालिकेच्या हद्दीत असले तरी चालीरिती विसरलेलं नाही.लाईनबझार हे हॉकीचं हब. तर कसबा बावडा टेनिस बॉल क्रिकेटची पंढरी आहे.
लहान गावातही दोन चार सेवा सोसायटी आणि इर्षेच राजकारण दिसत. इथं मात्र आशिया खंडातील अग्रगण्य अशी श्रीराम सोसायटी दोन अडीचे कोटींचा व्यवहार करते. अजून दोन चार सोसायट्या सहज निर्माण झाल्या असत्या. टोकाचं राजकारण असूनही गावात मतभेद नकोत म्हणून तसा प्रयत्नही कोणी केला नाही. गावात आमदार सतेज पाटील यांची एकमुखी सत्ता आहे. आमदार सतेज पाटील सांगतील ती गावकऱ्यांची दिशा आहे. एका आदर्श गावासाठी जे काही सांगता येईल, त्यापेक्षा अधिकच असूनही बावडेकर आता कुस बदलू पहात आहेत काय, असा प्रश्न जत्रेच्या निमित्ताने अश्लिल गाण्यांचा कार्यक्रम आयोजनावरुन उपस्थित होवू लागला आहे.
लावणी आणि सांस्कृतिक कार्यक्रमातून परंपरा जपलीच पाहिजे, यात दुमत नाही. याच उद्देशाने मागील काही वर्षात बावड्यात सहकुटुंब पाहता यावा, असा लावणी कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे ठरले. मात्र कालांतराने यामध्ये गावातील काही अपप्रवृत्ती शिरल्या. हातावर मोजणारी इतकी संख्या यांची असली तरी जे चाललय ते बरोबर नाही, अशी विचारधारा असलेल्या बहुसंख्यांना ते भारी ठरत गेले. मागील लावणी कार्यक्रमात बिभित्सपणाचे व्हिडीओ व्हायरल झाले होते, याची गंभीर दखल त्याच वेळी आयोजक म्हणवणाऱ्या सभ्य गृहस्थांनी घेणे गरजेचं होती. पण त्याकडे बेदखल केल्याने अपप्रवृत्तीचे फावले.
गावच्या जत्रेत मनोरंजन पाहिजेच, असे सांगत नेत्यांचे कानही भरले गेले. त्यामुळे लावणी पाहिजे असे सांगणारे हे टोळकं एका बाजूला आणि असला प्रकार नको असे म्हणणारे गाव दुसऱ्या बाजूला होते. हे नेत्यांना समजेपर्यंत आता खूप उशीर झाला. परिणामी बेलगाम झालेल्यांनी नृत्यांगणा प्रेक्षकांत जावून नृत्य करतील, अशी व्यासपीठाची रचना केली. नाच गाणं सुरू असताना स्टेजवर उभ राहूनच आस्वाद घेण्यापर्यंत यांची मजल गेली. बरं... ही सगळी मंडळी नेत्यांच्या जवळची असल्याने सांगून वाकडं कोण घेणार ? यातूनच या मंडळींच धाडस वाढतच गेले. या सगळ्याचा परिपाक म्हणून यंदाच्या जत्रेतील गाण्याच्या नावाखाली केलेल्या धिंगाण्यामुळे गावची अब्रु वेशीला टांगली गेली. बावड्यात असे नृत्यप्रकार होवूच कसे शकतात, अशी चर्चा सुरू झाली. आता यातून बोध घेवून किमान पुढील यात्रेत गावची शान आणि मान राहील, अशा कार्यक्रमांचे आयोजन होईल आणि याकडे नेते मंडळीही लक्ष देतील, अशी तूर्त अपेक्षा करण्यास हरकत नाही.
मोठी वारकरी परंपरा
बावड्यात प्रत्येक गल्लीच्या कोपऱ्यावर तालीम आहेच. इथ एकाच वेळी पिर आणि बावड्यात संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांची दोन भव्य मंडप आहेत. क्रमांकाने घरातून दिलेला अभिषेक येथे रोज घातला जातो. वारकरी परंपरा मोठी आहे. गणेश चतुर्थीला उत्सव धुमधडाक्यात साजरा करणाऱ्या गावाने सामाजिक एकोपाही प्राणपणाने जपला आहे. हा कायम रहावा अशीच समाजमाध्यमावर प्रतिक्रिया उमटत आहे.