लॉरा वूलव्हार्ट मानांकनात दुसऱ्या स्थानावर
वृत्तसंस्था, जोहान्सबर्ग (द.आफ्रिका)
द.आफ्रिकेच्या महिला क्रिकेट संघाला भारताविरुद्धची टी-20 मालिका 4-1 अशा फरकाने जिंकून देणारी कर्णधार लॉरा वूलव्हार्टने आयसीसीच्या महिलांच्या टी-20 फलंदाजांच्या ताज्या मानांकन यादीत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. या मालिकेत वूलव्हार्टने दर्जेदार फलंदाजी करत मालिकावीर आणि सामनावीर असा दुहेरी पुरस्कार मिळविला.
आयसीसीच्या टी-20 महिलांच्या फलंदाजांच्या ताज्या मानांकन यादीत वूलव्हार्टने आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकिर्दीतील दुसरे स्थान पटकाविले. यापूर्वी ती या यादीत तिसऱ्या स्थानावर होती. महिला फलंदाजांच्या ताज्या मानांकन यादीत ऑस्ट्रेलियाची जॉर्जिया व्हॉल अग्रस्थानावर आहे. इंग्लंड आणि वेल्स यांच्या संयुक्त यजमानपदाने 12 जूनपासून आयसीसी महिलांची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा सुरू होत असल्याने वूलव्हार्टच्या दमदार फलंदाजीमुळे द. आफ्रिकेचा महिला संघ दर्जेदार कामगिरी निश्चितच करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. भारताविरुद्ध झालेल्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत वूलव्हार्टने 330 धावा जमविल्याअसून त्यामध्ये एक शतक आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे.
आयसीसी महिलांच्या टी-20 फलंदाजांच्या मानांकन यादीत भारताची रिचा घोष 22 व्या स्थानावर आहे. तिचे स्थान 2 अंकांनी वधारले आहे. द. आफ्रिकेची सुने लुस या मानांकन यादीत 29 व्या स्थानावर आहे. आयसीसीच्या महिलांच्या टी-20 गोलंदाजांच्या मानांकन यादीत पाकची फिरकी गोलंदाज सादिया इक्बाल अग्रस्थानावर आहे तर अष्टपैलुंच्या मानांकन यादीत दिप्ती शर्मा पहिल्या स्थानावर आहे. गोलंदाजांच्या मानांकन यादीत द. आफ्रिकेची फिरकी गोलंदाज मलाबाने चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. भारताची श्री चरणी हिने 11 वे स्थान मिळविले आहे.
आयसीसीच्या महिलांच्या वनडे फलंदाजांच्या मानांकन यादीत बांगलादेशची निगार सुल्तानाने 35 वे स्थान तर शोभना मोसेट्रीने 45 वे स्थान मिळविले आहे. सध्या बांगलादेश आणि श्रीलंका महिला संघामध्ये वनडे मालिका सुरू आहे. वनडे महिलांच्या गोलंदाज मानांकन यादीत मारुफा अख्तरने 37 वे स्थान मिळविले आहे तर लंकेची कर्णधार चमारी अट्टापटूने वनडे अष्टपैलुंच्या मानांकन यादीत नवव्या स्थानावर झेप घेतली आहे.