वक्फ संपत्ती माहिती पोर्टलचा प्रारंभ
एका क्लिकवर माहिती, मुस्लीम संघटनांचा विरोध
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
केंद्र सरकारने वक्फ संपत्तीची माहिती देण्यासाठी पोर्टलचा प्रारंभ केला आहे. नव्या वक्फ कायद्यानुसार हे पोर्टल लाँच करण्यात आले आहे. ‘युनिफाईड वक्फ मॅनेजमेंट, एम्पॉवरमेंट, एफिशियन्सी अँड डेव्हलपमेंट पोर्टल’ असा या पोर्टलचा मथळा आहे. याचे लघुरुप ‘उम्मीद’ असे आहे. मुस्लीम व्यक्तीगत कायदा मंडळाने या पोर्टलला विरोध केला असून त्याविरोधात न्यायालयात दाद मागण्याची तयारी चालविली आहे. केंद्र सरकारने हे पोर्टल कायद्यानुसार असल्याचे स्पष्ट केले आहे. केंद्रीय कायदा मंत्री किरण रिजीजू यांनी या पोर्टलचे लाँचिंग केले आहे.
हे पोर्टल लाँच झाल्यापासून सहा महिन्यांच्या आत, आपली संपत्ती वक्फ करण्याची इच्छा असलेल्यांनी, तसेच आतापर्यंत वक्फ केलेल्यांनी या संपत्तीची सर्व माहिती या पोर्टलवर नोंद करायची आहे. वक्फ संपत्तीचे प्रबंधक किंवा मुतवल्ली यांनी ही माहिती या पोर्टलवर प्रसिद्ध करायची आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी किंवा वक्फ मंडळाचे सक्षम अधिकारी यांनी ही माहिती सत्यापित करावयाची आहे. त्यानंतर प्रत्येक वक्फ संपत्तीला 17 डिजिटस्चा एक परिचय क्रमांक प्रदान केला जाणार आहे. कोणत्याही वक्फ संपत्तीवर कोणीही कोणताही आक्षेप नोंदविला असेल, तर तो आक्षेपही या पोर्टलवर प्रसिद्ध करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
त्रिस्तरीय आक्षेप व्यवस्था
वक्फच्या कोणत्याही मालमत्तेवर किंवा संपत्तीवर कोणाचाही आक्षेप असल्यास आक्षेप घेणाऱ्याला अपील करण्याची त्रिस्तरीय व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात आली आहे. आक्षेप असणारी व्यक्ती वक्फ लवादाकडे दाद मागू शकते. वक्फ लवादाचा निवाडा मान्य नसेल तर उच्च न्यायालयात आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली जाऊ शकते. वक्फ लवादाकडे किंवा न्यायालयांमध्ये या संपत्तीसंबंधीचे विवाद नागरी दाव्याच्या पद्धतीने (सिव्हील सूट) सोडविले जाणार आहेत. अशी ही त्रिस्तरीय व्यवस्था नव्या कायद्यात निर्माण करण्यात आली आहे.
एका क्लिकवर मिळणार माहिती
येत्या सहा महिन्यांमध्ये देशातील सर्व वक्फ संपत्तींची माहिती या पोर्टलवर प्रसिद्ध झाली पाहिजे ही बाब अनिवार्य करण्यात आली आहे. एकदा ही माहिती पोर्टलवर प्रसिद्ध झाली, की कोणालाही या पोर्टलवर जाऊन ती एका क्लिकवर पहावयास मिळणार आहे. तसेच या संपत्तीसंबंधी विवाद आहेत काय, हे देखील या पोर्टलमधील माहितीवरुन समजणार असल्याने वक्फ संपत्तीच्या संदर्भात पारदर्शित्व निर्माण होणार आहे, असे प्रतिपादन केंद्र सरकारने शुक्रवारी केले आहे.
कायदामंत्र्यांकडून भलावण
या पोर्टलमुळे वक्फ संपत्तींच्या संदर्भातील गुप्तता किंवा गूढता संपणार असून सर्व संपत्तीची माहिती पारदर्शी पद्धतीने, सुलभरिता आणि कोणालाही पाहता येणार आहे. या व्यवस्थेमुळे वक्फ मालमत्तांसंबंधीचे गैरप्रकारही रोखले जाणार आहेत. हे पोर्टल ही एक क्रांतीकारक व्यवस्था असून या पोर्टलच्या माध्यमातून कोणीही वक्फ संबंधी कोणतीही माहिती मिळणार आहे, अशी भलावण रिजीजू यांनी केली आहे.
पोर्टलचा महत्वाचा लाभ
आधी वक्फ संपत्तींची माहिती केवळ काही मूठभर लोकांनाच होती. सर्वसामान्य जनतेला ही संपत्ती किती आहे, कोणी वक्फ केली आहे, केव्हा केली आहे आणि संपत्तीचा आकार किंवा किंमत किती आहे, याची कोणतीही माहिती मिळण्याची सोय नव्हती. या गुप्ततेचा दुरुपयोग करत अनेक सरकारी आणि खासगी मालमत्ताही गुपचुप वक्फ करण्यात आल्या आहेत, अशा असंख्य तक्रारी होत्या. आता ही अनावश्यक गुप्तता नष्ट होणार असून सर्व माहिती सर्वांसाठी उघड होणार आहे. हा या पोर्टलचा लाभ आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
काय आहे हे पोर्टल...
ड पोर्टलवर वक्फ संपत्तीची सर्व माहिती देणे कायद्यानुसार आहे अनिवार्य
ड हे पोर्टल लाँच झाल्यापासून सहा महिन्यांमध्ये सर्व माहिती द्यावी लागणार
ड माहिती पोर्टलवर अपलोड करण्याचे उत्तरदायित्व प्रबंधक केंवा मुतवल्लीवर
ड पोर्टलवरुन सर्व जनतेला कोणत्याही वक्फ संपत्तीची माहिती मिळू शकणार