For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

देशात नशामुक्ती अभियानाचा शुभारंभ

06:55 AM Aug 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
देशात नशामुक्ती अभियानाचा शुभारंभ
Advertisement

मोदी सरकारकडून 100 आठवड्यांसाठी मोहीम जाहीर : ‘जेन-झेड’वर लक्ष केंद्रित

Advertisement

वृत्तसंस्था

नवी दिल्ली

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘नशामुक्ती’ अभियानाचा शुभारंभ केला. त्यांनी प्रत्येक नागरिकाला विशेषत: तरुणांना, अमली पदार्थांच्या गैरवापराविरोधातील या 100 आठवड्यांच्या मोहिमेत सक्रियपणे सहभागी होण्याचे आवाहन केले. विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी देशातील तरुण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी, आत्मविश्वासू आणि अमली पदार्थांच्या व्यसनासारख्या हानिकारक सवयींपासून दूर राहणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन पंतप्रधानांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ‘व्यसनमुक्त युवा-विकसित भारत संकल्प अभियान’ सुरू केले. देशभरातील 10,000 हून अधिक ठिकाणांहून सहभागी झालेल्या तरुणांनी या 100 आठवड्यांच्या व्यसनमुक्ती मोहिमेत सहभाग घेतला. ‘माय भारत व्हॉलंटियर्स’, युवा क्लब, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, स्वयंसेवी संस्था, उद्योग संघटना आणि 125 हून अधिक आध्यात्मिक संघटनांचे प्रतिनिधीदेखील या कार्यक्रमात व्हर्च्युअली सामील झाले होते. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान मोदींनी आपले भाषणही दिले.

देश ‘विकसित भारत’ बनण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना आपले तरुण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी असणे, त्यांच्यात पूर्ण आत्मविश्वास असणे आणि ते अमली पदार्थांच्या प्राणघातक व्यसनापासून कायमचे दूर राहणे महत्त्वाचे आहे. हाच या अभियानाचा उद्देश आहे. गेल्यावर्षी काशीमध्ये एक प्रायोगिक प्रकल्प म्हणून याची सुरुवात करण्यात आली होती. आज, आपल्या कोट्यावधी देशवासियांच्या कल्याणासाठी 125 हून अधिक आध्यात्मिक संघटना आमच्यासोबत सामील झाल्या आहेत. शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांमधील लाखो विद्यार्थी ऑनलाईन सामील होत असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. या मोहिमेंतर्गत येणारे 100 रविवार हे ‘व्यसनमुक्त भारता’च्या दिशेने 100 भक्कम पावले असतील. आज हजारो शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांमधील लाखो विद्यार्थी या कार्यक्रमात ऑनलाईन सामील झाले. समाजाचा पाठिंबा, योग आणि ध्यानाची शक्ती, व्यसनाधीनतेविरुद्ध आपली सद्सद्विवेकबुद्धी मजबूत करते आणि आज आपल्याकडे व्यसनमुक्तीसाठी पुनर्वसन केंद्रांसारख्या सुविधाही असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

सामाजिक प्रतिष्ठेच्या नावाखाली पाठराखण नको!

एखादा तरुण चुकून अमली पदार्थांच्या व्यसनात अडकला, तरी याचा अर्थ असा नाही की त्याच्यासाठी सर्व मार्ग बंद झाले आहेत! आपण हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की, जर कुटुंबातील एखादे मूल अमली पदार्थांच्या व्यसनाचा बळी ठरले असेल, तर ते सामाजिक प्रतिष्ठेच्या नावाखाली लपवू नका. ज्यांना मदतीची गरज आहे त्यांच्याकडून ती मिळवा. वैद्यकीय मदतीने आपल्या मुलाला व्यसनातून मुक्त करण्याचा प्रयत्न करा. आपण कुटुंबातील मुलांसोबत मोकळ्या संवादाची संस्कृती देखील जोपासली पाहिजे, जेणेकरून ते अशा भोवऱ्यात अडकण्यापूर्वीच आपण त्यांचा हात धरू शकू, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

सामूहिक मोहीम यशस्वी करुया!

काही कामे अशी असतात की, ती एकट्याने करण्याचा प्रयत्न केल्यास कधीकधी निराशा, थकवा आणि लांबचा पल्ला गाठण्याची अनिच्छा येते. तथापि, जेव्हा एक सामूहिक मोहीम तयार होते आणि लाखो लोक खांद्याला खांदा लावून चालतात, तेव्हा जे लोक एकट्याने ते करू शकत नाहीत त्यांनाही ऊर्जा मिळते. आज, ही मोहीम त्या शक्तीचा उपयोग करून प्रत्येक तरुण हृदयाला स्पर्श करणार आहे. 100 आठवड्यांनंतर या मोहिमेचे एका जनआंदोलनात रुपांतर व्हायला हवे, आवाहन पंतप्रधानांनी केले.

तरुण, ‘जेन-झेड’ला पंतप्रधानांचा संदेश

व्यसनमुक्त युवा अभियानासाठी आयोजित कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आज आपण सर्व जे अभियान पाहत आहोत ते व्यक्तीसाठी, कुटुंबासाठी, समाजासाठी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रासाठी आहे. ‘विकसित भारतासाठी व्यसनमुक्त युवा’ हे अभियान, या चळवळीचे नावच तिचा दृढनिश्चय स्पष्टपणे दर्शवते, असे त्यांनी पुढे सांगितले.

शत्रू देश ‘लाभ’ उठविण्याच्या प्रयत्नात

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आपले शत्रू देश व्यसनाधीन तरुणांना जाळ्यात अडकवतात आणि देशाविरुद्ध कट रचतात. ते आपला अमली पदार्थांचा व्यवसाय वाढवण्यासाठी अशा तरुणांचा वापर करतात. त्यामुळे आपण आपल्या तरुणांचे संरक्षण केले पाहिजे. व्यसन संपूर्ण कुटुंबांना उद्ध्वस्त करते. अमली पदार्थांच्या व्यापारातून प्रचंड पैसा कमविण्याचा लाभ शत्रूराष्ट्र मिळवत असल्याचा दावाही पंतप्रधानांनी केला.

ही मोहीम काय आहे?

► अमली पदार्थांच्या गैरवापराविरोधात सामूहिक चळवळीसाठी शैक्षणिक संस्था, युवा संघटना, नागरी समाज गट, उद्योग संस्था आणि आध्यात्मिक संघटनांना एकत्र आणून सामुदायिक सहभाग मजबूत करणे हा 100 आठवड्यांच्या या देशव्यापी जनसहभाग मोहिमेचा उद्देश आहे.

► या मोहिमेंतर्गत देशभरात दर रविवारी साप्ताहिक उपक्रम आयोजित केले जातील. या उपक्रमांमध्ये क्रीडा स्पर्धा, वॉकेथॉन, ध्यान सत्रे, सांस्कृतिक कार्यक्रम, जनजागृती मोहीम, पथनाट्यो, चर्चासत्रे, कला स्पर्धा आणि सामुदायिक सहभाग कार्यक्रमांचा समावेश असेल.

Advertisement
Tags :

.