‘लक्षण’ मोबाईल अॅपचे अनावरण
लहान मुलांच्या डोळ्यांची काळजी घेणे होणार सुलभ
प्रतिनिधी/ बेळगाव
खासगी वैद्यकीय संस्थांनी समाजाच्या आरोग्य रक्षणासाठी सरकारबरोबर मिळून नवे संशोधन करावे. या संशोधनांच्या माध्यमातून सामाजिक स्वास्थ्य राखण्यासाठी कार्यरत रहावे, असे आवाहन काहेरचे उपकुलगुरु डॉ. नितीन गंगाणे यांनी केले.
केएलई संस्थेचे डॉ. प्रभाकर कोरे इस्पितळातील नेत्रतज्ञ डॉ. स्मिता प्रभू यांनी विकसित केलेल्या ‘लक्षण’ मोबाईल अॅप्लिकेशनचे अनावरण करताना ते बोलत होते. शनिवारी हा कार्यक्रम झाला. नसांसंबंधीच्या आजारात लहान मुलांमध्ये नेत्रदोष आढळून येतो. त्यांच्या भविष्यासाठी संशोधनांची गरज आहे. संशोधनानंतर त्याची अंमलबजावणी करताना आपण मागे पडतो. त्यामुळे उपचारांत त्रास सहन करावा लागतो. ही गैरसोय टाळण्यासाठी वैद्यकीय कागदपत्रे सुरक्षितपणे ठेवण्याची गरजही डॉ. नितीन गंगाणे यांनी बोलून दाखविली.
याआधी बहुतेक उपकरणे परदेशातून मागविली जात होती. साहजिकच त्यांची किंमत अधिक होती. आता आपल्यातच अनेक डॉक्टर संशोधन करू लागले आहेत. त्यांनी उत्तमरित्या कार्य केल्यास समाजाला मदतीचे ठरणार आहे, असेही डॉ. नितीन गंगाणे यांनी सांगितले. यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. एन. एस. महांतशेट्टी म्हणाल्या, नेत्र शस्त्रचिकित्सा करणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. मात्र नसांच्या त्रासामुळे त्रस्त असलेल्या लहान मुलांची समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. ज्यांना नेत्रसमस्या उद्भवू शकतात. त्यांचा शोध घेण्यासाठी मोबाईल अॅप साहाय्यक ठरणार आहे.
यावेळी हुबळी येथील डॉ. एम. एम. जोशी, नेत्रसंस्थेचे डॉ. प्रसाद आर., ज्येष्ठ बालरोग तज्ञ डॉ. व्ही. डी. पाटील, केएलई इस्पितळाचे वैद्यकीय संचालक कर्नल डॉ. एम. दयानंद, कुलसचिव डॉ. एम. एस. गणाचारी, डॉ. राजेश पवार, डॉ. आरिफ मालदार, डॉ. अरविंद तेनगी, डॉ. एस. बी. पाटील, डॉ. भाग्यजोती, डॉ. चेतना, डॉ. महेश कमते, डॉ. विनायक कोपर्डे, डॉ. रामचंद्र भट, डॉ. मीना, डॉ. नेहा आदी उपस्थित होते. डॉ. शिवानंद बुबनाळे यांनी स्वागत केले. डॉ. स्मीता प्रभू यांनी आभार मानले.