2 अमृत भारत, 6 वंदे भारतचे लोकार्पण
पंतप्रधान मोदींनी दाखवला हिरवा झेंडा : अयोध्येतील अन्य लोकोपयोगी विकास प्रकल्पांचेही उद्घाटन
► वृत्तसंस्था/ अयोध्या
आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या आणखी 8 रेल्वेगाड्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोट्यावधी देशवासियांना भेट दिल्या आहेत. अयोध्येत शनिवारी पंतप्रधान मोदींनी दोन नवीन अमृत भारत आणि सहा नवीन वंदे भारत टेनला हिरवा झेंडा दाखवला. तसेच अयोध्या नगरीचा सर्वांगीण विकास करण्याच्या उद्देशाने 15 हजार कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन केले.
अयोध्येत बांधण्यात येत असलेल्या भव्य राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी अयोध्या दौऱ्यावर होते. येथे त्यांनी अनेक प्रकल्पांचे उद्घाटन केले. पंतप्रधानांच्या उपस्थितीत भारतीय रेल्वेच्या ताफ्यात दाखल झालेल्या अमृत भारत एक्स्प्रेसमध्ये 12 स्लीपर क्लास कोच, 8 अनारक्षित द्वितीय श्रेणी डबे आणि 2 गार्ड डबे असणार आहेत. नजिकच्या काळात सर्व भारतात या गाड्यांचा संचार होणार आहे. या गाड्यांची रचना अत्याधुनिक पद्धतीने करण्यात आली असून प्रवाशांच्या सोयींचा विचार करण्यात आला आहे. याचप्रसंगी पंतप्रधान मोदींनी सहा नवीन वंदे भारत टेनला हिरवा झेंडा दाखवला. यामध्ये श्री माता वैष्णोदेवी कटरा-नवी दिल्ली वंदे भारत एक्स्प्रेस, अमृतसर-दिल्ली वंदे भारत एक्स्प्रेस, कोईम्बतूर-बेंगळूर पॅन्ट वंदे भारत एक्स्प्रेस, मंगळूर-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस, जालना-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस आणि अयोध्या-आनंद विहार टर्मिनल वंदे भारत एक्स्प्रेस यांचा समावेश आहे.
पंतप्रधानांनी अयोध्या धाम रेल्वे जंक्शन स्थानक, अमृत भारत रेल्वेगाड्या, रेल्वे पायाभूत सुविधा निर्माण, नूतन अयोध्या विमानतळ, पर्यटकांसाठी सुविधा प्रकल्प आणि अयोध्या परिसर सुधारणा असे प्रकल्प मार्गी लावले आहेत. अयोध्येच्या छोट्या रेल्वेस्थानकाचे नूतनीकरण करण्यात आले असून त्यासाठी 240 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या रेल्वेस्थानकाची तीन मजली वास्तू निर्माण करण्यात आली असून तिचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. या प्रकल्पामुळे अयोध्या रेल्वेस्थानकाचा कायापालट झाला आहे.
रेल्वे पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते 2,300 कोटी रुपयांच्या तीन रेल्वे पायाभूत सुविधांचा शुभारंभ होणार आहे. रुमा-चकेरी-चंदेरी तिसरी रेल्वे लाईन प्रकल्प, जुनापूर-अयोध्या-बाराबंकी रेल्वेलाईनचे दुहेरीकरण आणि मल्हौर-दालीगंज रेल्वेलाईनचे विद्युतीकरण आणि दुहेरीकरण हे ते तीन प्रकल्प आहेत.
पंतप्रधानांचे दलिताच्या घरी चहापान
आपल्या दौऱ्यात पंतप्रधानांनी अयोध्येत दलित महिला मीरा मांझी यांची भेट घेत त्यांच्या घरी बनवलेला चहाही स्विकारला. मीरा मांझी या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या 10 कोटीव्या लाभार्थी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मीराच्या घरी काही काळ मुक्काम करत त्यांनी कुटुंबीयांशी चर्चा केली.
8 किलोमीटर लांबीचा रोड शो
विकास प्रकल्पांचे उद्घाटन करण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी अयोध्येत 8 किलोमीटर लांबीचा भव्य रोड शो केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी अयोध्येला पोहोचले तेव्हा विमानतळावरून बाहेर पडल्यानंतर पंतप्रधानांचा रोड शो झाला. यावेळी लोकांनी त्यांचे फुलांनी स्वागत केले. रस्त्याच्या दुतर्फा लोकांची गर्दी केली होती. याप्रसंगी बाबरी खटल्यातील वकील हाशिम अन्सारी यांचा मुलगा इक्बाल अन्सारी हे पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी गुलाबाच्या फुलांचा वर्षाव करताना दिसले. ‘अयोध्या सर्वांना संदेश देते, येथे हिंदू आणि मुस्लीम सर्व एकत्र राहतात आणि एकमेकांच्या कार्यक्रमात सहभागी होतात’, असे इक्बाल अन्सारी म्हणाले. विशेष म्हणजे बाबरी प्रकरणात इक्बाल अन्सारी पक्षकार होते आणि मंदिरासाठी ही जमीन देण्याच्या विरोधात होते. त्यासाठी ते न्यायालयात खटला लढत होते. 2020 मध्ये जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी अयोध्येत पोहोचले होते तेव्हा त्यांनीही त्यांचे स्वागत केले होते. इक्बालला राम मंदिर कन्स्ट्रक्शन ट्रस्टकडूनही प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण मिळाले आहे.