मुख्यमंत्र्यांच्या आसनावरून विधानपरिषदेत हास्यकल्लोळ
बेळगाव : विधानपरिषद सदस्य हणमंत निराणी यांनी राज्यात विविध खात्यांतील रिक्त पदाबाबतचा प्रश्न मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना प्रश्नोत्तर तासात विचारला. यावर उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या उभे राहिले. मात्र यावेळी आसनव्यवस्था योग्य नसल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपली खुर्ची व्यवस्थित नसल्याचे सभागृहात बोलून दाखविले. यामुळे सभागृहात एकच हशा पिकला. यावर मुख्यमंत्री स्पष्टीकरण देताना आपली खुर्ची व्यवस्थित नाही म्हणजे आपण उभे आहोत ती जागा व आसनाची जागा कमी असल्याने आपल्याला उत्तर देताना अडचणी येत असल्याचे सांगितले. यानंतर पुन्हा एकदा सभागृहात हशा पिकला.
तुमची खुर्ची शाबूत आहे का? असा टोमणा विरोधी पक्षनेते चलवादी नारायणस्वामी यांनी मुख्यमंत्र्यांना मारला. यावर सिद्धरामय्या प्रत्युत्तर देताना आपली खुर्ची तर शाबूत आहेच, तुमची खुर्ची सुरक्षित आहे का? ते आधी बघा, असा प्रतिटोला लगावला. यामुळे सभागृहात पुन्हा हास्यकल्लोळ निर्माण झाला. यानंतर विधानपरिषद सदस्य शशील नमोशी यांनीही आसन व्यवस्थेबाबत नाराजी व्यक्त करत याची दुरूस्तीची मागणी सभापती बसवराज होरट्टी यांच्याकडे केली. बसवराज होरट्टी यांनी सभागृह नेते बोसराजू यांनी उद्यापर्यंत आसन व्यवस्था योग्यरित्या करावी, अशी सूचना केली.