For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लातूरच्या स्क्रॅप मार्केटमध्ये प्रिन्स स्टील डेपोला भीषण आग; कलरच्या डब्यांचे एकापाठोपाठ स्फोट; लाखोंचे साहित्य जळून खाक

05:24 PM Sep 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
लातूरच्या स्क्रॅप मार्केटमध्ये प्रिन्स स्टील डेपोला भीषण आग  कलरच्या डब्यांचे एकापाठोपाठ स्फोट  लाखोंचे साहित्य जळून खाक
Advertisement

लातूर : शहरातील स्क्रॅप मार्केट रोड परिसरात जैन गोरक्षणाशेजारी असलेल्या प्रिन्स स्टील डेपोला आज दुपारी सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. आगीत डेपोतील लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. आगीचे स्वरूप एवढे तीव्र होते की, अग्निशमन दलाला तब्बल दोन ते अडीच तास शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणावी लागली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Advertisement

प्रिन्स स्टील डेपोमध्ये कलरचे डबे, ताडपत्री, प्लास्टिक पत्रे तसेच अन्य ज्वलनशील साहित्य मोठ्या प्रमाणात साठवण्यात आले होते. त्यामुळे सुरुवातीला किरकोळ स्वरूपाची असलेली आग काही वेळातच भडकली आणि आगीने रौद्ररूप धारण केले.

दरम्यान, आगीत मोठ्या प्रमाणात कलरचे डबे असल्याने त्यांचे स्फोटासारखे मोठे आवाज येत होते. अचानक होणाऱ्या या आवाजांमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

Advertisement

प्राथमिक माहितीनुसार, डेपोच्या मागील बाजूस असलेल्या गोरक्षणाच्या कडब्याला आग लागल्यानंतर ती डेपोपर्यंत पोहोचल्याची चर्चा आहे. मात्र, आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आगीच्या घटनेनंतर पोलीस आणि संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू आहे.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, आग पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने अग्निशमन दलाच्या जवानांना बचावकार्य करताना अडचणींचा सामना करावा लागला. अनेक नागरिक मोबाईलवर आगीचे व्हिडिओ काढण्यासाठी घटनास्थळी गर्दी करत होते.

अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर आग आटोक्यात आणण्यात आली. या दुर्घटनेत मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले असून, नुकसानाचा नेमका आकडा तपासानंतर स्पष्ट होणार आहे. दरम्यान, शहराच्या मध्यवर्ती भागातील या आगीच्या पार्श्वभूमीवर ज्वलनशील साहित्याच्या साठवणुकीबाबत प्रशासनाने खबरदारी घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

Advertisement
Tags :

.