अमित शाह यांच्या आदेशानुसार लाठीचार्ज
अभिजीत दीपके यांचा दावा : मोदी सरकारवर पुन्हा जोरदार हल्ला
वृत्तसंस्था
नवी दिल्ली
20 जुलैच्या संसद मोर्चादरम्यान विद्यार्थ्यांवर बळाचा वापर करण्याचे आदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीच दिले असावेत, असा दावा ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे (सीजेपी) संस्थापक अभिजीत दीपके यांनी केला आहे. तसेच या पोलीस कारवाईवरून त्यांच्या राजीनाम्याची मागणीही त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली. देशातील लोकशाही धोक्यात आहे, न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे, तर राजकीय पक्ष फोडण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर केला जात असल्याचे दावेही त्यांनी केले.
‘कॉक्रोच जनता पार्टी’ने नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ दिल्लीत महिनाभर आंदोलन केले. धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षणमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आणि केंद्र सरकारने आंदोलकांच्या सर्व मागण्या मान्य केल्यानंतर हे आंदोलन संपले. दिल्लीतील यशस्वी आंदोलनानंतर अभिजीत दीपके आपल्या महाराष्ट्रातील मूळ निवासस्थानी दाखल झाला आहे. येथे विविध माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना दीपके यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर थेट शाब्दिक हल्ला चढवला आहे.
‘सीजेपी’च्या आंदोलनावेळी पोलिसांनी पेलेट गनपासून ते एके-47 पर्यंत सर्व काही वापरले गेले. आम्ही गुन्हेगार आहोत की दहशतवादी? असा प्रश्न करत हे विद्यार्थी आणि तरुणांचे आंदोलन असताना सरकारने अशा शस्त्रांचा वापर केल्याचे ते म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना थेट लक्ष्य करताना पोलीस केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत काम करत असल्यामुळे अशा शस्त्रांचा वापर करणे, विद्यार्थ्यांवर हल्ला करणे आणि लाठीचार्ज करण्याची संपूर्ण जबाबदारी गृहमंत्र्यांची आहे, असेही त्यांनी नमूद केले.
केंद्रीय यंत्रणांच्या गैरवापराचे आरोप
अभिजीत दीपके यांनी न्यायव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचे म्हटले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारखे पक्ष मोडण्यासाठी ईडी आणि सीबीआय यांचा कसा वापर केला गेला हे आपण सर्वांनी पाहिले आहे. लोकशाही टिकवणे ही देशाच्या सर्वोच्च संस्थांची जबाबदारी होती. आता हुकूमशाही थांबवण्यासाठी केवळ विरोधी पक्षांनीच नव्हे, तर सामान्य जनतेनेही एकत्र आले पाहिजे, असे ते पुढे म्हणाले.