महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

महायुतीतच सुप्त संघर्ष

06:27 AM Sep 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बदलापूरमध्ये झालेल्या घटनेचा निषेध असो किंवा मालवण राजकोट गडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची दुर्घटना या दोन्ही घटनेनंतर महाविकास आघाडीतील पक्षांनी महायुती तसेच राज्य सरकार विरोधात दाखविलेली एकी तर दुसरीकडे महायुतीत रोज कोणत्या ना कोणत्या कारणाने थेट मित्रपक्षांमध्येच कुरघोडी सुरु आहे. हे बघता आता लाडकी बहीण योजनेनंतर निर्माण झालेल्या वातावरणाला या घटनांमुळे ब्रेक बसला असून पंधरा दिवसापूर्वी फ्रंटफुटवर असलेली महायुती आता काहीशी बॅकफुटवर आल्याचे बघायला मिळत आहे.

Advertisement

महायुतीत असलेल्या शिवसेना आणि भाजपाकडून वारंवार अजित पवारांच्या राष्ट्रवादीला टार्गेट केले जात आहे. शिवसेनेचे मंत्री तानाजी सावंत यांच्यानंतर आता कर्जतचे शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी अजित पवार गट दगाबाजी करत असल्याचा आरोप केला आहे. तर भाजपचे प्रवक्ते गणेश हाके यांनी राष्ट्रवादीसोबत युती म्हणजे विसंगत विवाह असून विधानसभा निवडणुकीत ही युती कायम ठेवल्यास पक्षाचे वाईट होईल असे वक्तव्य केल्याने भविष्यात राष्ट्रवादी महायुतीत असणार का? असा सवाल आता उपस्थित होत आहे.

Advertisement

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेले यश बघता राज्यातील विधानसभेची सगळी समीकरणे आता बदलली आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला पोषक वातावरण असल्याचे अनेक सर्व्हेतून पुढे येत आहे. त्यामुळे महायुतीतील शिवसेना भाजप सोबत गेलेल्या अनेक नेत्यांना आता महाविकास आघाडीत जाण्याचे वेध लागले आहेत. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अपयशानंतर राज्य सरकारने अनेक योजनांच्या घोषणा केल्या. त्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारसाठी आगामी विधानसभा निवडणुकीत तारणहार ठरेल असे वाटत होते. त्या अनुषंगाने राज्यात या योजनेचे मोठ्या थाटात ब्रॅण्डींग देखील करण्यात आले, मात्र बदलापूर येथील शाळेतील अल्पवयीन मुलींचे लैंगिक अत्याचार प्रकरण हाताळण्यात सरकारला आलेले अपयश, मुख्यमंत्र्यांच्या जिह्यातच हे प्रकरण झाल्याने विरोधकांनी हे प्रकरण चांगलेच लावून धरले. त्यातच या प्रकरणात भाजप आणि शिवसेना नेत्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे महायुतीच अडचणीत आल्याचे बघायला मिळाले तर दुसरीकडे राज्य सरकारला आगामी विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरणाऱ्या आणि राज्यात मोठ्या प्रमाणात लोकप्रिय ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा धुरळाच खाली बसला.

सध्या महायुतीतच गोंधळाची स्थिती पहायला मिळत असून, रोज उठून एकमेकांवर आरोप-टीका करण्याची जणू स्पर्धाच लागल्याचे बघायला मिळत आहे. रामदास कदम आणि रवींद्र चव्हाण यांच्यातील आरोप प्रत्यारोपानंतर थेट युती तोडण्याची भाषा करण्यात आली. या वादावर पडदा पडतो न पडतो तोच मंत्री तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादीबाबत केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादी विरूध्द भाजप असा जोरदार सामना बघायला मिळाला.

आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपला तसा युती म्हणून लढताना कोणत्याही मतदार संघात राजकीय पेच निर्माण होत नसल्याचे दिसत आहे. मात्र राष्ट्रवादी (अजित पवार) गटाला सोबत घेतल्यानंतर भाजप-शिवसेनेला लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीतही राष्ट्रवादीची अडचण ठरत असल्याचे दिसत आहे. त्याच भावनेतून राष्ट्रवादीला भाजप आणि शिवसेनेकडून सातत्याने टार्गेट केले जात आहे.

राष्ट्रवादीच्या अजित पवार गटावर बोलण्याची सुरूवात केली शिवसेना नेते रामदास कदम यांनी, कदम यांनी थेट शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या भाषणावेळीच अजित पवारांना जरा उशिरा सरकारमध्ये घेतले असते तर चालले नसते का? असा सवाल विचारताना भाजपने शिवसेनेचा कसा गेम केला हे सांगितले.

लोकसभेला भाजपने शिवसेनेच्या भावना गवळी, कृपाल तुमाणे, हेमंत पाटील यांची तिकीटे कापली तर हेमंत गोडसे, यामिनी जाधव यांची शेवटच्या क्षणी उमेदवारी जाहीर केल्याने पुरेसा वेळ मिळाला नसल्याची खंत कदम यांनी जाहीरपणे व्यक्त केली होती. लोकसभा निवडणुकीत भाजपला मतदारांनी नाकारल्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांनी भाजपवर राष्ट्रवादीच्या माध्यमातून टीका करण्यास सुरूवात केली, आता तर भाजप आणि शिवसेना यांच्यात स्थानिक पातळीवर सुप्त संघर्ष सुरूच असून लोकसभेला भाजपच्या कलेने घेणाऱ्या शिंदे यांनी विधानसभेला मात्र गाफील न राहता सर्वच मतदार संघात जोरदार तयारी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबरच त्यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी देखील राज्यात जनसंवाद दौरा सुरू केला आहे तर दुसरीकडे मुंबईतील उध्दव ठाकरेंसोबत असलेल्या शिवसेनेच्या नगरसेवकांचे शिंदे गटात पक्ष प्रवेश सुरूच आहे. मात्र भाजपमध्ये मात्र गेल्या महन्याभरात काँग्रेसचे आमदार जितेश अंतापुरकर सोडता कोणताही मोठा पक्षप्रवेश झालेला नाही. अंतापुरकर यांना काँग्रेसने पक्षविरोधी कारवाई केल्याने उमेदवारी देणार नसल्याचा निर्णय घेतल्याने अंतापुरकर यांनी भाजपात प्रवेश केल्याचे बोलले जात आहे, तर दुसरीकडे समरजीत घाडगे नंतर आता हर्षवर्धन पाटील, मदन भोसले हे केव्हाही भाजपची साथ सोडू शकतात. महायुतीतील भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात जास्तीत जास्त जागा पदरात पाडून आमदारांची संख्या वाढविण्याकडे सगळ्याच पक्षांचा कल दिसत आहे, तर भाजपप्रणीत महायुती सरकारला सत्तेपासून रोखण्यासाठी महाविकास आघाडीत अद्याप तरी समन्वय असल्याचे बघायला मिळत आहे.

मुंबईत दहीहंडीच्या निमित्ताने शिवसेना आणि भाजपने जोरदार शक्तीप्रदर्शन केले, आता काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने पुन्हा एकदा मुंबईत जोरदार राजकीय संघर्ष बघायला मिळणार आहे. दोन वर्षापूर्वी शिवसेना आमदार सदा सरवणकर यांच्या बंदुकीतून गणेश विसर्जन मिरवणुकीत राजकीय राडा झाला असताना हवेत गोळ्या चालल्या होत्या. यंदाचा गणेशोत्सव हा विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय श्रेय घेण्यासाठी शेवटची मोठी संधी असणार आहे, मुंबईत तर आतापासूनच राजकीय बॅनर वॉर सुरू झाले असून गणेशेत्सव निर्विघ्नपणे पार पडो हीच मनोकामना!

 

प्रवीण काळे

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article