आवडीच्या गोष्टीतून कायम टिकणारे सुख मिळते
हा समज नष्ट झाला की, इच्छा होणे बंद होते
अध्याय तिसरा
भगवंत अर्जुनाला म्हणाले, माणसाला होणाऱ्या इच्छा व त्या अपूर्ण राहिल्याने येणारा क्रोध यांच्यामुळे मनुष्य पाप करण्याला तयार होतो. काम क्रोध हे शरीराबरोबरच उत्पन्न होतात व इंद्रिये, मन बुद्धी यांचे मार्फत जिवात्म्याला मोहात गुंतवतात. शिकलेल्यांना आपण श्रेष्ठ आहोत असे उगीचच वाटत असते. त्यामुळे त्याला ते जाता जाता गुंडाळून टाकतात. त्यांना दडपून गप्प बसवावे म्हंटले तर ते शक्य होत नाही. असे हे काम-क्रोध जिंकण्याला कठीण असले, तरी त्यांना जिंकण्याचा एक चांगला उपाय म्हणजे प्रारंभी इंद्रियांचे नियमन करून ज्ञान व विज्ञान म्हणजे अध्यात्म व प्रपंच यांचा नाश करणाऱ्या इच्छांचा त्याग कर. काम क्रोधांचे वास्तव्य इंद्रियांच्या ठिकाणी असते. ही इंद्रिये माणसाला विविध विषयांचे आकर्षण दाखवत असतात. त्यामुळे ते विषय मिळवण्यासाठी ते माणसाला कर्म करायला भाग पाडतात. म्हणून प्रारंभी या इंद्रियांवर विजय मिळव. त्यासाठी एक लक्षात ठेव ते म्हणजे ह्या ज्ञानेंद्रियानी विषयांचे कितीही आकर्षण दाखवले व त्या गोष्टी हव्याशा वाटल्या तरी त्यापासून मिळणारे सुख हे कायम टिकणारे नसते.
पुढील श्लोकात मन, बुद्धी ह्यांच्या स्थानाबद्दल सांगून भगवंत पुढे म्हणतात, स्थूल देहापेक्षा इंद्रिये सूक्ष्म व श्रेष्ठ आहेत. इंद्रियांच्या पलीकडे मन आहे. मनाच्या पलीकडे बुद्धी आहे. बुद्धीच्याही पलीकडे तो परमात्मा आहे.
इंद्रिये बोलिली थोर मन त्याहूनि थोर ते । बुद्धि थोर मनाहूनि थोर तीहूनि तो प्रभु ।। 42 ।।
ह्या अध्यायातला हा कळीचा श्लोक आहे.
श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात,मनात विषयांचे विचार येणे बंद झाले की, इंद्रियांनी विषयांचे आकर्षण दाखवणे बंद होते. त्यामुळे विषय हे सुखदायक आहेत हा बुद्धीचा गैरसमज नाहीसा होतो. विषयातून सुख मिळते हा समज नष्ट झाला की, काम म्हणजे इच्छा होणे बंद होईल. इच्छाच होत नाहीत म्हंटल्यावर त्या तृप्त झाल्या नाहीत म्हणून राग येण्याची शक्यता संपुष्टात येते.
पुढील श्लोकात भगवंत सांगतात, अशा प्रकारे मन आणि बुद्धी काबूत आले की, बुद्धीतून श्रेष्ठ स्वयंप्रकाशमान परमेश्वराला जाणून, दुर्जन अशा कामरूपी शत्रूचा तू नाश कर.
असा तो प्रभू जाणूनि आवरी आप आपणा । संहारी काम हा वैरी तू गाठूनि परोपरी ।। 43 ।।
माउली म्हणतात, ज्याप्रमाणे सूर्यकिरण नसतील तर मृगजळ दिसत नाही त्याप्रमाणे मन आणि बुद्धीतून काम, क्रोध नष्ट झाले, तर ते नि:संशय गेले असे जाण. काम क्रोध जर नाहीसे झाले, तर ब्रम्हरूपी स्वराज्याची प्राप्ती होते आणि तो पुरुष आपल्या शुद्ध अंत:करणामुळे सुखाच्या राशींचा अनुभव घेऊ लागतो. हीच सद्गुरू व शिष्यांची गुह्य अशी गोष्ट आहे, हे जीव व ब्रह्माचे ऐक्य आहे. त्या ठिकाणी स्थिर झालेला शिष्य तेथून कधीही ढळत नाही.
सर्व सिद्धांचा राजा, देवी लक्ष्मीचा पती, देवांचा देव श्रीकृष्ण पुढील अध्यायात एक पुरातन कथा सांगतील. ती कथा ऐकून अर्जुन काही प्रश्न विचारेल, भगवंत त्याला उत्तरे देतील. त्यांच्या ह्या अनमोल संवादाची योग्यता, त्यातील शांत आदि रसवृत्ती श्रोत्यांना श्रवणसुखाने समृद्ध करतील. निवृत्ती महाराजांचे शिष्य श्रीज्ञानेश्वर महाराज श्रोत्यांना पुढे सांगतात, शुद्ध बुद्धीने प्रतिभेचा चंद्र प्रकाशित करून श्रीकृष्ण-अर्जुनाचा हा सुखसंवाद श्रवण करा.
अध्याय तिसरा समाप्त