हस्तांतरणापूर्वी शेवटचा हात?
कॅन्टोन्मेंटच्या बैठकीत आज होणार महत्त्वाचे निर्णय
प्रतिनिधी / बेळगाव
कॅन्टोन्मेंट बोर्डच्या हस्तांतरणापूर्वी सोमवार दि. 15 रोजी महत्त्वाची बैठक बोलाविण्यात आली आहे. या बैठकीमध्ये मागील अनेक दिवसांपासून रखडलेल्या कामांना मंजुरी देण्यात येणार आहे. हस्तांतरणाची प्रक्रिया सुलभ होण्यासाठी या बैठकीमध्ये अनेक निर्णय घेतले जाणार आहेत. त्यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्डमधील नागरिकांच्या नजरा या बैठकीकडे लागल्या आहेत.
बेळगावसह देशातील 16 हून अधिक कॅन्टोन्मेंट बोर्डचे स्थानिक महानगरपालिकेमध्ये हस्तांतरण केले जाणार आहे. मालमत्तांची मालकी जरी कॅन्टोन्मेंट बोर्डकडे असली तरी त्यांचे व्यवस्थापन व सुविधा पुरविण्याची जबाबदारी महानगरपालिकेकडे दिली जाणार आहे. या बदल्यात मनपाकडून मालमत्तांवर कर आकारणी केली जाणार आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये हस्तांतरण प्रक्रियेबाबत प्राथमिक चर्चा करण्यात आली होती.
सोमवारी होणाऱ्या बैठकीमध्ये महत्त्वाचे निर्णय होणार आहेत. कॅन्टोन्मेंट बोर्डचे नामकरण, कॅम्पमधील रस्त्यांचे नामांतरण, जुने भाजी मार्केट परिसरात पार्किंग झोन यासह विविध कामांना मंजुरी दिली जाणार आहे. हस्तांतरणापूर्वी रखडलेल्या कामांना मंजुरी देण्यासाठी कॅन्टोन्मेंटचे प्रयत्न सुरू आहेत.
उद्या राज्य सरकारसोबत बैठक
कॅन्टोन्मेंट बोर्डचे महानगरपालिकेमध्ये हस्तांतरण करण्यासंदर्भात मंगळवार दि. 16 रोजी कॅन्टोन्मेंट बोर्डचे अधिकारी, संरक्षण मंत्रालयाचे अधिकारी तसेच राज्य सरकारचे वरिष्ठ प्रतिनिधी या बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत. ही बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होण्याची शक्यता आहे. यावेळी हस्तांतरण होणाऱ्या मालमत्ता तसेच इतर विषयांवर चर्चा होणार आहे.