गेली 50 वर्षे पाण्याविना!
फक्त कोका कोला पिऊन जिवंत, मधुमेहाचीही समस्या
मानवासाठी पाणी पिणे किती महत्त्वाचे आहे हे सांगण्याची कोणालाही गरज नाही. पाण्याशिवाय जीवन शक्मय नाही हेही सर्वांना माहीत आहे. पण ब्राझीलच्या एका व्यक्तीने असा दावा केला आहे, जो ऐकल्यानंतर तुम्हाला पाण्याच्या महत्त्वावर शंका येऊ लागेल. या व्यक्तीचे म्हणणे आहे की, गेल्या 50 वर्षांपासून तो फक्त कोका कोला पिऊन जिवंत आहे. त्याने पाण्याचा एक थेंबही प्याला नाही. पण हे खरोखर शक्मय आहे का, किंवा तो फक्त खोटे बोलत आहे? याबाबत संभ्रम निर्माण झाल्याशिवाय राहत नाही.
ऑडिटी सेंट्रल न्यूज वेबसाईटच्या रिपोर्टनुसार, ब्राझीलमधील बाहिया येथे राहणारे 70 वषीय रॉबर्टो पेडरेरा यांना कोका-कोलाचे जगातील सर्वात मोठे चाहते म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. रॉबर्ट सांगतात की, गेल्या 50 वर्षांपासून आपण फक्त कोका कोला पीत आहे. स्वत:ला हायडेट ठेवण्यासाठी तो फक्त कोका कोला सेवन करतो. त्याला मधुमेह आणि हृदयविकार देखील आहे, तरीही तो कोका कोला पिऊन आयुष्य जगत आहे.
त्याला अनेक आजार असूनही तो कोक सेवन करतो. त्याला वाटते की कोक पिणे इतके वाईट असते तर आपण आतापर्यंत दगावलो असतो. पण तो जिवंत आहे. आपल्याला पाणी प्यायला आवडत नसल्याचेही त्याने डॉक्टरांना सांगितले. त्याला यापूर्वी हृदयविकाराचा झटकाही आला आहे. पण तो कोणाचेच ऐकत नाही. आता आपले वय 70 वर्षे आहे. भरपूर आयुष्य आपण जगलो आहे, आता मेलो तरी काही फरक पडत नाही, पण पाणी पिणार नाही, असे तो बिनधास्त सांगत दिवसामागून दिवस आनंदात वावरत आहे.
काही वर्षांपूर्वी जेव्हा रॉबर्टला कोविडमुळे ऊग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेव्हा त्यांनी त्यांच्या हॉस्पिटल केअर चार्टमध्ये स्पष्टपणे लिहिले होते की ते आपली औषधे पाण्याने नव्हे तर कोका कोलाने पितील. त्यांचा हा चार्ट सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यावेळी लोकांना वाटले की तो खोटे बोलत आहे, परंतु त्याच्या 27 वर्षांच्या नातवाने आजोबांना कोका कोलाशिवाय दुसरे काहीही पिताना पाहिले नसल्याचे स्पष्ट केले आहे.